Prakash Mahajan on Jitendra Awhad नाशिक : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राज्यभरातून त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मनसेचे नेते तथा प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी देखील नाशिकच्या मालेगावमधून त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. 


राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असेही त्यांनी म्हटले आहे.


आव्हाडांनी आपले नाक कापून केला अपशकून


त्यांच्या या वक्तव्याचा महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, प्रदीर्घ लढ्यानंतर राम मंदिर उभे राहत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सगळ्या गोष्टीला अपशकून कसा करायचा, आव्हाडांनी आपले नाक कापून अपशकून केला. राम हे बहुजनांचे होते. ते मांसाहारी होते. म्हणजे बहुजनांचा नेता हा मांसाहारीच असतो, असे थोडीच आहे. बहुजनांमध्ये किती साधू संत होऊन गेले. ते मांसाहारी नव्हते म्हणून ते बहुजनांचे नव्हते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 


राम तुमच्या एकट्याचेच आहेत का?


आताच जितेंद्र आव्हाडांना हे का आठवलं? रामाचा आदर्श घ्या, पण तो तुम्हाला परवडणार नाही. अल्पसंख्याकांचा वापर करून निवडून येण्यात तुमचे आयुष्य गेले. पण आता तुमच्या लक्षात आलंय की, रामच कामाचे आहे.  तुम्ही एकटेच बहुजनांचे आहात का? राम तुमच्या एकट्याचेच आहे का? आव्हाडांना राम हे मांसाहारी होते हा साक्षात्कार कुठून झाला? असेही समाचार त्यांनी घेतला आहे.  


शरद पवारांवर आरोप


मला आश्चर्य शरद पवारांचे वाटते की, त्यांनी असे लोक आपल्या जवळ बाळगले आहेत.  शरद पवार हे सातत्याने हिंदू धर्माच्या अस्मितेवर घाला घालतात. मात्र वैयक्तिक आयुष्यात ते सर्व पाळतात. एकीकडे म्हणतात मंदिराच्या उद्घाटनाला मी जात नाही. दुसरीकडे इफ्तीयार पार्ट्यांना जातात.  समाजात दुही निर्माण होईल असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आव्हाड, मिटकरी अशी पिलावळ शरद पवार यांनी पाळून ठेवली आहे. शरद पवार देखील अशा नेत्यांचे समर्थन का करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


छाती ठोकपणे खोटं बोलतात


महाराष्ट्रातील काही लोकांना मेंदूचा नारू झालाय त्यातील एक जितेंद्र आव्हाड आहेत. छाती ठोकपणे खोटं बोलतात आणि त्याची त्यांना लाज देखील वाटत नाही.आनंदाच्या क्षणात कसे विरझन घालता येईल याचा प्रयत्न आव्हाड करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Khadse : जितेंद्र, वडीलकीच्या नात्याने मी सल्ला देतोय, वादग्रस्त वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचा सल्ला