मुंबई : नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीचा उमेदवार कोण असणार, याचा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र,भाजपने या जागेवरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला होता. परंतु, आता छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसाठी आपले नाव अमित शाह (Amit Shah) यांनीच कशाप्रकारे सुचवले, याचा घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला.
छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे नाशिक लोकसभेची ऑफर आपल्याला कशाप्रकारे देण्यात आली, हे सांगितले. त्यांनी म्हटले की, होळीच्या दिवशी मला अजितदादांचा निरोप आला म्हणून मी देवगिरी बंगल्यावर गेलो होतो. तिथे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल बसले होते. एक वाजता मला देवगिरी बंगल्यावर बोलावण्यात आले होते. आम्हाला नाशिकला जायचं होतं, पण अजितदादांनी बोलावल्याने मी तिकडे गेलो. बंगल्यावर गेल्यानंतर मी अजित पवार यांना विचारलं मला कशासाठी बोलावलं? तेव्हा अजित पवार म्हणाले की, आम्ही नुकतेच दिल्लीवरुन परत आलो आहोत. त्याठिकाणी आमची अमित शाह यांच्याशी लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी नाशिक लोकसभेचा विषय आला. तेव्हा आम्ही सांगितले की, नाशिकमध्ये आमचे आमदार आहेत, ती जागा आम्हाला द्या. त्यावर अमित शाह यांनी विचारले की, तुमचा उमेदवार कोण आहे? तेव्हा आम्ही समीर भुजबळ यांचे नाव सांगितले. मात्र,अमित शाह म्हणाले की, नाशिकमध्ये समीर भुजबळ नव्हे तर छगन भुजबळ उभे राहतील.
यावर मी बोललो की, पण मी लोकसभेची उमेदवारी मागितलीच नव्हती. त्यावर अजितदादा म्हणाले की, अमित शाह यांनी नाशिकच्या जागेवरुन छगन भुजबळ लढतील, असे सांगितले आहे. आम्ही त्यांना सांगितले की, त्याठिकाणी शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. त्यावर अमित शाह म्हणाले की, त्यांना आम्ही समजवू. हे सगळे ऐकून घेतल्यानंतर मी अजित पवार यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अजितदादांना भेटायला गेलो. मी पुन्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, तुम्हालाच लढावं लागेल. त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो आणि चाचपणी सुरु केली. सुदैवाने मला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिकमधील मराठा, ब्राह्णण, दलित आणि आदिवसारी समाज मला पाठिंबा द्यायला तयार होता, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळांना अजितदादांच्या सांगण्यावर विश्वास बसेना म्हणून फडणवीसांना फोन केला
अमित शाह यांनी तुम्हाला नाशिक लोकसभेच्या जागेवरुन लढण्यास सांगितले आहे, या अजितदादांच्या सांगण्यावर छगन भुजबळ यांना विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मी फडणवीसांना फोन केला आणि दिल्लीत काय घडले, याबाबत विचारले. तेव्हा फडणवीसही म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हालाच नाशिकमधून लढायला सांगितले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मीदेखील त्या बैठकीत होतो. अमित शाह यांनी नाशिकच्या जागेसाठी तुमच्याच नावाचा आग्रह धरला, असे भुजबळांनी सांगितले.
आणखी बातम्या
'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा