Onion News : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळं (Climete Change) चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा मोठा फटका बसत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


Nashik : नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  (Farmers) फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळं हा कांदा सडू लागला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय.


मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ


दर नसल्यानं शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता. गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरिपाचे गणित बसवता येईल या आशेवर शेतकरी होता. मात्र, साठवलेला कांदा चाळीत सडू लागल्यानं कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. खरीपासाठी भांडवल उपलब्ध व्हावं यासाठी मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


सर्वाधिक मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना


गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले होते. याचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता. फळबागांचेही मोठे नुकसान झाले होते. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चाळीत ठेवलेला कांदा देखील सडू लागल्यानं बळीराजा चिंतेत आहे. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते.


महत्त्वाच्या बातम्या:


Onion News : कांद्याला जाहीर केलेलं 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्या, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा येवला तहसीलवर मोर्चा