श्रीरामपूर : 50 वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर करण्याचा विक्रम केलाय. हा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला असून मोठ्या विक्रमाला गवसणी घालणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची मुळगाव असलेल्या श्रीरामपूर शहरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. 


द्वारका विश्वनाथ डोखे (Dwarka Dokhe) या त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील अधिकारी आहेत. सध्या द्वारका डोखे या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून काही वर्षांपूर्वी द्वारका यांच्या वाचनात "साद देती हिम शिखरे" हे पुस्तक आलं आणि त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले.


अशी केली तयारी 


द्वारका डोके यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प करताच, त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली. 2023 मध्ये त्यांनी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील मैदान व जिमचा सराव सुरू केला. एव्हरेस्ट सर करताना ज्या-ज्या शारीरिक कसरती कराव्या लागणार, त्याची तयारी त्यांनी अकादमीत केली.


50 दिवसांत माऊंट एव्हरेस्ट सर


24 मार्च 2024 रोजी त्या काठमांडू येथे पोहोचल्या. एव्हरेस्ट शिखर सर करणारी कंपनीचे मालक लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोहीमेला सुरुवात केली. या मोहिमेत पासंग शेरपा हे द्वारका डोके यांच्यासमवेत शेवटपर्यंत सोबत होते. 17 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून चढाई सुरू केली. 22 मे रोजी पहाटेच्या 4 वाजून 10 मिनिटांनी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज, महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज हातात घेत त्याठिकाणी राष्ट्रगीत म्हटले. तसेच, जो संकल्प त्यांनी केला, त्यानुसार आई-वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत. एखादी गोष्ट करायचा निश्चय मनाशी ठरला तर त्याला वय आडवे येत नाही हेच द्वारका डोखे यांनी सिद्ध केलय हे मात्र नक्की. दरम्यान, एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्या २३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचल्या. तर, त्यांच्या गावी सोमवारी (ता. २७) सकाळी सात वाजता पोहोचताच त्यांचे जंगी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.


आणखी वाचा


Succes Story : सिंहगडावर लिंबू सरबताचा स्टॉल, वडिलाचं छत्र नाही पण पठ्ठ्यानं सर केला एव्हरेस्ट; लहू उघडेच्या जिद्दीची कहाणी