Nashik News नाशिक : स्थानिक आणि परप्रांतीय वादामुळे नाशिकच्या एम जी रोडवरील (M G Road) मोबाईल मार्केट (Mobile Market) दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे जवळपास 60 ते 70 लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. जवळपास शंभरहून अधिक दुकाने उघडलेली नाहीत. मोबाईल विक्री आणि रिपेअरिंग क्षेत्रात राजस्थानी नागरिकांची मक्तेदारी वाढल्याचा आरोप करत स्थानिक मराठी विक्रेते (Marathi Sellers) आक्रमक झाले आहेत. 


एमजी रोडवरवर सुमारे 250 मोबाईल रिपेअर, स्पेअरपार्ट आणि नवीन मोबाईल विक्रेते आहेत. ऍक्सेसरीज आणि होलसेल साहित्य विक्री करणारे राजस्थानी व्यापारी मोबाईल रिपेअरिंगही करतात. जिल्हाभरातील मराठी मोबाईल व्यावसायिक एम जी रोडवरील राजस्थानी व्यापाऱ्यांकडून होलसेल भावात मोबाईल ऍक्सेसरीज खरेदी करत असतात. मात्र एका मराठी व्यावसायिकासोबत झालेल्या वादानंतर राजस्थानी व्यापाऱ्यांनी एकत्र येत त्याच्यावर बहिष्कार टाकत त्याला कोणीच माल न देण्याचा निर्णय घेतला. 


स्थानिक आणि परप्रांतीय वादात मनसेची उडी


राजस्थानी व्यापारी (Rajasthani traders) मराठी व्यापाऱ्यांकडील रिपेअरींगची कामे करत नाहीत, त्यांना डावलतात, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व मराठी व्यवसायिकांनी एकत्र येत राजस्थानी व्यावसायिकांना जाब विचारताच राजस्थानी व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकानेच बंद केलीत. विशेष म्हणजे मनसेनेही (MNS) यात उडी घेत मराठी व्यवसायिकांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 


राजस्थानी व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सूर


राजस्थानी दुकानदारांनी केवळ होलसेल साहित्य विक्री करायची आणि महाराष्ट्रीयन दुकानदाराने मोबाईल रिपेरिंग व इतर साहित्य विक्री करावी अशी मागणी काही दुकानदारांकडून करण्यात आल्याने या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. यातच मनसेने (MNS) स्थानिकांच्या बाजूने उडी घेतल्याने मात्र राजस्थानी व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.


काही दुकाने सुरु 


दरम्यान, या परिसरातील सर्वच मोबाईल साहित्य विक्री करणाऱ्या व रिपेरिंग (Mobile Repairing) करणाऱ्या दुकानदरांनी मार्केट बंद ठेवले आहे. काल दिवसभर दुकानदारांमध्ये बैठका झाल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही. आज देखील या व्यावसायिकांच्या बैठका होणार आहेत. काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. मात्र अजूनही संपूर्ण दुकाने उघडण्यात आलेली नाहीत.  


इतर महत्वाच्या बातम्या 


महायुतीत नवा भिडू, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंची चर्चा, देवेंद्र फडणवीस दाखल, लोकसभेसाठी प्लॅनिंग


काँग्रेसची बँक खाती गोठवली, निवडणूक लढवू नये म्हणून सत्ताधाऱ्यांचं कृत्य; काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप