Chhagan Bhujbal : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यामुळे मनसेचा महायुतीमध्ये (Mahayuti) समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे महायुतीमध्ये येत असतील तर आनंदच आहे. इंडिया आघाडीमध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत. राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही. याचा फायदा विधानसभा आणि मनपाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल. पहिली निवडणूक विदर्भात आहेत. बाकी नंतर आहेत. कोणाची ताकद किती आहे हे मला माहिती नाही. कोणाला तरी बरोबर घायाचे आहे तर जागा द्याव्या लागतील. 


नाशिक लोकसभेबाबत छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य


महायुतीत नाशिकची नक्की कुणाला मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटप हळूहळू होतायत. 20 मे रोजी नाशिकची निवडणूक आहे. त्यामुळे अजून वेळ आहे. पाच टप्प्यात निवडणुका आहेत. त्यामुळे जागावाटप हळूहळू होत आहे. काही ठिकाणी निवडणुकांसाठी खूप वेळ आहे.  मोदी साहेबांना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे. त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केले नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्यावर नेते बघतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


श्रीनिवास पवारांवर काय म्हणाले भुजबळ? 


बारामतीमधील (Baramati) काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझे सगळे ऐकले, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. यावर छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की,  याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. विरोध करा पण भाषा जपून वापरा. राजकारणात विरोधात असले तरी तुमच्यात रक्ताचे नात आहे. कुठल्या कार्यक्रम समारंभाप्रसंगी एकत्र यावे लागते.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात देखील वाद झालेत. मात्र त्यांच्यात काही अडचण आली तर ते एकमेकांना फोन करतात. मदतीसाठी धावून येतात, असे भुजबळांनी म्हटले आहे. 


शिवसेनेचं हिंदुत्व चालतं मग भाजपचं का नाही?


ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेबरोबर होता तोपर्यंत कोणी काही बोलले नाही. शिवसेना आणि भाजप एकच हिंदूत्वाचा विचार आहे. शिवसेनेचं हिंदुत्व चालत मग भाजपचं का नाही? आम्ही फक्त युती केली. भाजपमध्ये विलीन झालो नाही, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर चालणार पक्ष आमचा पक्ष वेगळा आहे, असेही भुजबळांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा 


Raj Thackeray - Amit Shah Meet : दिल्लीत मोठ्या घडामोडी! मनसे-भाजप युती होणार, राज ठाकरेंची अमित शाहांसोबत खलबतं