Nandurbar Postmortem Room : नंदुरबारच्या (Nandurbar) शहादा नगरपालिका रुग्णालयाचे (Shahada Municipal Hospital) शवविच्छेदनगृह (Post Mortem Room) गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे शहादा शहरासह परिसरातील नागरिकांना नैसर्गिक आपत्ती अथवा अपघाती दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. मृतदेह शवविच्छेदनासाठी 16 किलोमीटर दूर असलेल्या म्हसावद तालुका शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावा लागतो. मरणानंतरही मृतदेहाच्या मरणयातना संपताना दिसत नाहीत.


शहादा शहराची 65 हजारांपर्यंतची लोकसंख्या बघता नगरपालिका रुग्णालयाला शवविच्छेदनगृह आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून ते कुचकामी आहे. कोणत्याही प्रकारचे शवविच्छेदन केले जात नाही. शवविच्छेदनगृहाला कुलूप लावण्यात आलेले आहे. मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. शहादा शहरातील कोणत्याही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी 16 किलोमीटर अंतरावर म्हसावद तालुका शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात जावं लागतं. नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लागतो. शिवाय वेळही अधिक जातो. काही वेळा दोन-दोन दिवस प्रेत पडून राहते. प्रेतांची हेळसांड होते. अनेक वेळा मोठे वाद झाले आहेत. मात्र अद्याप अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. कोणतीही दखल घेतलेली नाही. नगरपालिका प्रशासनाने देखील याची गंभीर घेतलेले नाही. 


वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करता येत नाही. सध्याचे वैद्यकीय अधिकारी आहेत ते बीएएमएस पदवीधारक आहेत. ते शवविच्छेदन करु शकत नाहीत. असंख्य पदे रिक्त आहेत. तीन ते चार कर्मचारीच आहेत. त्यामुळे शवविच्छेदनगृह बंद केलेले आहे 


मरणानंतर मोक्ष प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं. मात्र उलट स्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळते. मरणानंतरच्या मोक्षापेक्षा या ठिकाणी शवविच्छेदनासाठी अधिक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत हे सत्य आहे. विकासाच्या गप्पा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना ही मोठी चपराक असल्याचे मानले जात आहे.


आरोग्य सुविधांच्या अभावी गरोदर महिलेला झोळीत टाकून डोंगरदऱ्यांमधून जीवघेणा प्रवास  
एकीकडे ही परिस्थिती असताना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात पायाभूत सुविधांची किती भीषण परिस्थिती आहे याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आरोग्य सुविधा नसल्याने गरोदर महिलेला झोळीत टाकून आरोग्यसेवक आणि नातेवाईकांना डोंगरदऱ्यातून प्रवास करावा लागला. काही दिवसांपूर्वी कुवलीडांबर या गावात राहणाऱ्या विमल वसावे या गरोदर महिलेला अचानक पोटात कळा सुरु झाल्या. आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकेने प्राथमिक उपचार केले. मात्र वेदना कमी होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विमल वसावे यांना बांबूची झोळी तयार करुन तब्बल सहा किलोमीटर डोंगरदऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात दाखल केले.