नंदुरबार : आमची महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले (Nana Patole) कारणीभूत आहेत, असा खळबळजनक दावा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नंदुरबार (Nandurbar) येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली. लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरून नीलम गोऱ्हे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत. नाना पटोले हे विनोदाचा भाग आहे. त्यांच्या शब्दाला विनोदा पलिकडे काही अर्थ नाही, अशी टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे. महिलांना मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांना ते बघवत नाही का? असा सवालही नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.
महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार
भंडारा येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय गंभीर आहे. यासाठी महिलांना शस्त्र दिले पाहिजे. घडलेली घटना वाईट आहे मात्र महिला धाडसीने पुढे येऊन गुन्हा नोंदवताय हे महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोर्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कुठल्याही क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोर्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि कोण खरं, कोण खोटं हे सिद्ध होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
आणखी वाचा