Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2018 ते 2022 या पाच वर्षाचा कालावधीत एकूण 1278 महिला आणि 274 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या (Kidnaped) गुन्ह्यातील पीडीत मुली अद्यापही सापडल्या नाहीत. ही संख्या लक्षात घेता मिसिंग असलेल्या महिला आणि मुलींना शोधण्यासाठी नंदुरबार (Nandurbar) जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 1207 महिलांना तर 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यास पोलीस (Nandurbar Police) दलाला यश आले आहे.


राज्यभरातून बेपत्ता होणाऱ्या (Missing Girls) महिला आणि मुलींची संख्या ही चिंताजनक असून या विषयावर गेल्या काही दिवसात राज्यभर खळबळ उडाली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क (Missing Desk) तयार करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाच्या मार्फत पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला आणि पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवुन ते मिळून येण्याकरीता प्रयत्न केले जातात. दरम्यान नंदुरबार पोलिसांनी याच अनुषंगाने बेपत्ता झालेल्या तरुणींना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. 


त्यानुसार नंदुरबार पोलीस दलाच्यावतीने बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 1 जून 2021 पासून पोलीस नियंत्रण कक्ष येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून. यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यात 1 पोलीस अधिकारी व 2 पोलीस अंमलदार असे एकूण 12 अधिकारी आणि 24 कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांनी सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यात जाऊन बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचा शोध घेतला असून आतापर्यंत 1207 महिला आणि 263 अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.


अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष 


तसेच अपहरणाच्या गुन्ह्यांतील शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरीता पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडून अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात येत असतो. मागील दोन वर्षात सन 2017 पासून शोध न लागलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे.