Nandurbar : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या दुर्गम गाव पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. येथील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तर दुसरीकडं जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, त्यावरील उपाययोजना अजूनही पूर्ण झाल्या नसल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे. या पाणीटंचाईच्या भयानक वास्तवाचे उदाहरण धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे गाव आहे.
खर्डी बुद्रुक आणि परिसरातील महिलांना पाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी वागत आहे. या गावाच्या चार ते पाच पाड्यांना पाणी उपलब्ध करुन देणारी एकच विहीर असून तिचीही पाणी पातळी खोल गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन तास थांबल्यानंतर पाणी घेऊन तीन ते चार किलोमीटरची पायपीट महिलांना करावी लागत आहे. प्रशासनाचा पाणी टंचाई निवारण आराखडा फक्त कागदावर; Eus.
गावाची मदार एकाच विहिरीवर
धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे जवळपास १२०० पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव या गावाचा विस्तार जवळपास पाच किलोमीटर परिसरात आहे. या परिसरातील एकूण चार ते पाच पाड्याचे नागरिक तीन ते चार किलोमीटर दूर येऊन एका विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी येत असतात. पाण्यासाठी या परिसरातील नागरिकांची दररोज तीन ते चार किलोमीटरची पायपीट असते. हिवाळ्यात गावात असलेल्या एकमेव विहिरीला चांगले पाणी होते. मात्र आता पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच सर्वच गावाची मदार या एकाच विहिरीवर असल्याने महिलांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.
गावात पाण्याची टाकी बांधून व्यवस्था करावी
आम्ही दिवसभर शेतात काम करतो. शेतातून आल्यानंतर पाण्यासाठी आम्हाला तासोन तास वाट पाहावी लागत असते. थकून गेल्यावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असतो. सरकारनं आमच्या गावात पाण्याची टाकी बांधून पाण्याची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. सरकार गतिमान कामांच्या मोठमोठ्या गप्पा करत असला तरी आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिल्हा प्रशासन आणि सरकारने पाणीटंचाईच्या केलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा हीच अपेक्षा.
महत्त्वाच्या बातम्या:
Hingoli News: मराठवाड्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर