Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावर वसलेल्या अनेक गावांना जोडणारा भगदरी महूफळी इथला मुख्य पूल (Bridge) कोसळला आहे. यामुळे 17 गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे भगदरी हे गाव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं दत्तक गाव आहे. मात्र त्याकडेही प्रशासनाचं लक्ष नाही. 


मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या पुलाचा काही भाग वाहून गेला होता. त्यावेळीही नागरिकांना दळणवळणाची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांनी त्यावेळी या समस्येची माहिती प्रशासनाला देऊन त्याची जाणीव करुन देत, जीर्ण झालेल्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु संबंधित विभाग आणि अधिकारी यांनी लक्ष न दिल्याने काल (25 ऑगस्ट) अखेर पुलाचा भाग खाली खचला. पुल खचला त्या वेळी सुदैवाने पुलावरुन वाहतूक नव्हती.


भगदरी गावातील हा मुख्य पुल तुटल्याने नर्मदा काठावरील, वनवाई, कंजाला, मांडवा, डनेल, मोजापाडा, उंबिलापाडा, वेलखेडी, पलासखोब्रा, माकडकुंड, डेब्रामाळ या गावांना होणारा संपर्क आता पुल दुरुस्त होईपर्यंत तुटणार आहे. जवळपास परिसरातील 17 गावातील नागरिकांना तसंच भगदरी गावातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रम शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी देखील याच रस्त्याने येत जात असल्याने त्यांनाही मोठी अडचण निर्माण झाली आहे.


राज्यपालांनी गाव दत्तक घेतलं खरं पण...
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील भगदरी हे गाव विकासासाठी दत्तक घेतलं आहे. राज्यपालांनी 2020 मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला आणि भगदरी गाव दत्तक घेतलं होतं. राज्यपालांनी दत्तक घेतल्याला गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु ग्रामस्थ अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. गावात ना पूर्ण क्षमतेने वीज आहे ना कनेक्टिव्हिटी. त्यातच आता नर्मदा काठांवरील गावांना जोडणार मुख्य पूलही कोसळला आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या गावातच प्रशासनाचं लक्ष नाही तर इतर जिल्ह्यांचा विचारच न केलेला बरा, अशा भावना इथल्या नागरिकांच्या आहेत.


दरा प्रकल्प ओव्हर फ्लो, पर्यटकांची गर्दी
दुसरीकडे शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तसंच परिसरात असलेली हिरवळ आणि वनीकरण विभागाने जगवलेले जंगल यासह विविध नैसर्गिक सौंदर्याचा उधाण करणाऱ्या बाबी या परिसरात असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक दरा प्रकल्पाला भेट देत आहेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संरक्षण यंत्रणा नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असल्याचं दिसून येत आहे. धरण परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.