Nandurbar Crime : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील सोनखुर्द जरीपाडा येथील महिलेला पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण (Beaten) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे हि महिला सिकलसेल पीडित असल्याचे उघडकीस आले आहे. असे असताना देखील महिलेला पोलीस अधिकाऱ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली असून यानंतर महिला बेशुद्ध पडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील हा प्रकार असून याबाबत संबंधित महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार धडगाव पोलीस ठाण्यातील (Dhadgaon Police Station) पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत असताना महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकल सेल आजाराने पीडित असतांनाही बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याचा प्रकार धडगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


सदरील महिलेच्या पती हा अवैध दारूचा (Illegel Liqour) व्यवसाय करतो असे सांगत पोलिसांनी 21 तारखेला तिच्या घराची झाडाझडती घेतली.  पती घरात न मिळाल्याने सदरील महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. विशेष म्हणजे सदरील महिला सिकलसेल आजाराने ग्रस्त असून त्यासंबंधी तिने पोलिसांना वारंवार सांगून देखील तिला बेदम मारहाण झाल्याचा आरोप सदरील पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी दोन दिवसांच्या टाळाटाळीनंतर धडगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटने प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे.


दरम्यान छाया राजेश पटले असे पीडित महिलेचे नाव असून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी मारहाण करत असताना सदर महिलेने मारू नका मी आजारी आहे. अशा विनवण्या केल्यानंतरही पोलिसांनी तिचे काही न ऐकता मारहाण सुरूच ठेवली. तसेच महिलेला दमबाजी करत 'तू आजारी आहे; त्याला आम्ही जबाबदार नाही', अशा शब्दात ताडण केल्याचा आरोप देखील तक्रारदार महिलेने केला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
धडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचारी हे संबंधित महिलेच्या घरी गेले. सदर महिलेचा पती दारूचा व्यवसाय करतो, अशी माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस पथक महिलेच्या घरी दाखल झाले. पती कामानिमित्त बाहेर गेला असता महिला एकटी घरात होती. तिला पतीबद्दल विचारणा करत पोलीस उपनिरीक्षकासह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या जबर मारहाणी संबंधित महिला जबर जखमी झाली असून ती सिकलसेल पीडित महिला असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या पोलीस पथकाबरोबर एका महिला पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होती. मात्र तिने काहीही न करता पोलिसांनीच या महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


असा झाला उलगडा 
घटनेच्या काही वेळानंतर सदर महिलेचा पती घरी आल्यावर हि बाब निदर्शनास आली. पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर महिला शुद्धीवर आल्यावर सर्व हकीगत आपल्या पतीला सांगितली. मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अखेर पीडित पती-पत्नीने पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उशिरा रात्री तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र संबंधित महिलेच्या विरोधातही पोलिसांनीच क्रॉस कम्प्लेंट केल्याचे समजते आहे.