नंदुरबार : दिशादर्शक फलकावर गावाचा नावावर अनेकवेळा खाडाखोड केल्याने अनेक वाद होत असतात, मात्र नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावरील दिशादर्शक फलकावर एका देशाचा उल्लेख वाचताना अनेकांचा भुवया उंचावत आहेत. डाब या गावातील एका रस्त्यावर लिहिलेल्या फलकावर जपान असा उल्लेख असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 


साता समुद्रापार असलेल्या जपानला जाण्यासाठी अनेकांचे स्वप्न असतं. जपानने प्रगती विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली भरारी अनेकांना या देशाकडे आकर्षित करते. परंतु जर सातपुड्याच्या दुर्गम भागात जपानला जाण्यासाठी रस्ता असल्याचे तुम्हाला सांगितलं तर ते खरं पटणार नाही. परंतु ही किमया केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने. नंदुरबार जिल्ह्यातील डाब येथे लावण्यात आलेल्या गावांच्या दिशादर्शक फलकावर थेट जपान असा उल्लेख केला आहे.


नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला डाब, तोडीकुंड, चिवलउतारा, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जमाना गावाकडे जाण्यासाठी डांब येथूनच रस्ता जातो. त्यामुळे या ठिकाणी तो दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. त्यावर शेवटचे गाव जपान असे लिहिल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या दिशादर्शक फलकावर जमाना या नावाच्या 'मा' चा जागेवर 'पा' आणि 'ना' चा जागेवरचा काना बाजूला करून 'न' असं करत नावात छेडछाड करून त्याला जापान असं करण्यात आलं आहे. 


जपान देशाचा उल्लेख या आदिवासी पाड्यावर आल्याने नंदूरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


ही बातमी वाचा: 


Sunita Dhangar : लाचखोर धनगर मॅडमवर तर कारवाई, पण ज्याने तक्रार केली त्याची होतेय अडवणूक; दोन महिन्यानंतरही कामासाठी मारावे लागतात खेटे