Nandurbar News : ऊस तोडणीसाठी राज्यभरात मजूर स्थलांतर करत असतात. ऊस तोडणीसाठी ते ज्या ठिकाणी थांबत असतात त्या ठिकाणी तात्पुरता स्वरुपाचा निवारा उभारत असतात. मात्र थंडी वाऱ्यात त्यांच्याकडे असलेल्या अपूर्ण साहित्यामुळे परिवारातील अनेक सदस्य उघड्यावर असतात. ही बाब लक्षात घेत नंदुरबारमधील (Nandurbar) इन्कलाब फाऊंडेशनच्या (Inquilab Foundation) वतीने ऊसतोड मजुरांसाठी (Sugarcane Workers) टेन्ट सिटी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.


काय आहे इन्कलाब फाऊंडेशनचा टेन्ट सिटी उपक्रम?


ऊस तोडणीसाठी राज्यभरातून मजूर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित होत असतात. हे तात्पुरता स्वरुपाचे स्थलांतर असले तरी ऊसतोड मजूर जास्त साहित्य सोबत ठेवत नाहीत. त्यामुळे ते राहतात त्या ठिकाणी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असतं. त्यात थंडी, ऊन, वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देत असताना त्यांच्याकडे अनेक साहित्याची उणीव असते. तसेच या काळात वातावरणातील बदल लक्षात घेत अनेक समस्या निर्माण होत असतात. हीच बाबत लक्षात घेत इन्कलाब फाऊंडेशनच्या वतीने टेन्ट सिटी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम ऊसतोड मुजरांच्या परिवारासाठी असून त्यात मच्छरदाणी, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट आणि इतर साहित्य दिलं जातं. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर शहादा तालुक्यात करण्यात येत असून याची व्याप्ती राज्यभर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं इन्कलाब फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आलं.


ऊसतोड मजुरांकडून समाधान व्यक्त


वाढत्या थंडीत आणि डासांमुळे आमच्या वस्तीत आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अंथरुण मर्यादित असल्याने थंडीत मुलं उघड्यावर पडत होती. मात्र इन्कलाब फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या तंबूमुळे आता आम्हाला यातून सुटका मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेखा राठोड या ऊसतोड मजूर महिलेने दिली आहे. 


उपक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढवण्याचा इन्कलाब फाऊंडेशनचा प्रयत्न 


इन्कलाब फाऊंडेशनने  शहादा तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा इन्कलाब फाऊंडेशनचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान इन्कलाब फाऊंडेशनच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी सुरु करण्यात आलेला हा प्रोजेक्ट राज्यातील इतर साखर कारखाने आणि सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल हे मात्र निश्चित.


भारतात बहुतांश ऊसाची तोडणी कामगारांद्वारे


भारतामध्ये अनेक ठिकाणी यंत्राद्वारे ऊसतोडणी केली जाते, परंतु जास्त ऊसतोड कामगारांद्वारेच होते. कोयत्याने ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे, त्या उचलून आणि वाहून मोठ्या वाहनात भरणे आणि वाहतूक करणे इत्यादी कामं ऊसतोड कामगारच करतात. महाराष्ट्रात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. ऊस तोडणीत महिलांचा सहभाग हा पुरुषाच्या बरोबरीने असतो.