Nandurbar News : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बाजार म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या (Sarangkheda) घोडेबाजाराने विक्रमी उलाढाल केली असून ती गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उलाढाल आहे. घोडेबाजारात यावर्षी सतराशे घोडे (Horse) विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी नऊशे घोड्यांची विक्री झाली असून त्यातून चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या सारंगखेड्याच्या (Nandurbar) घोडेबाजाराला अनेक ऐतिहासिक परंपरा लाभल्या आहेत. जातिवंत घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी सारंगखेड्याचा घोडेबाजार प्रसिद्ध असून संपूर्ण देशभरातून अश्वशौकीन या ठिकाणी घोडे खरेदीसाठी येत असतात. विशेष म्हणजे देशभरात होणाऱ्या पशु बाजारात घोड्यांसोबत इतर प्राण्यांची ही विक्री होते, मात्र या ठिकाणी फक्त घोड्यांची खरेदी विक्री होत असते. यावर्षी घोडेबाजारात चांगलीच तेजी पाहण्यास मिळाली. सर्वाधिक महाग घोडी 15 लाख रुपयाला विक्री झाल्याची नोंद बाजार समितीत आहे. बाजारात झालेल्या उलाढालीचा विचार केला असता दहा वर्षातील ही सर्वात मोठी उलाढाल असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सारंगखेडा फेस्टिवलला देशभरातून हजारो अश्वप्रेमी येत असतात. त्यामुळे फेस्टिवलमध्ये आयोजित घोडे बाजारात देशभरातून मोठ्या प्रमाणात व्यापारी आपले घोडे विक्रीसाठी आणत असतात. या माध्यमातून स्थानिक परिसरातील मजुरांना देखील चारा विक्रीच्या माध्यमातून मोठा रोजगार मिळत असतो. त्यासोबत घोड्याचे साज आणि इतर वस्तूंच्या विक्रीतूनही मोठे उलाढाल होत असते. दरम्यान यंदाच्या सारंगखेड्याच्या घोडेबाजाराने सर्व विक्रम मोडले असून गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर जवळपास चार कोटीचा टप्पा यंदाच्या फेस्टिवलमध्ये पार केला आहे. दरम्यान यात्रा आता शेवटच्या टप्प्यात असून व्यापाऱ्यांनी आपले घोडे परत पाठवण्यास सुरुवात केली आहे मात्र यावर्षी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षीही बाजारात मोठी तेजी राहील असा अंदाज चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.
जातिवंत घोड्यांची खरेदी विक्री...
सारंगखेड्याच्या घोडेबाजार नुकरा, काठीयावाड, मारवाड, सिंध जातीच्या एकाहून एक सरस आणि देखणे घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात या वर्षी घोडेबाजारात सतराशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी नऊशे घोड्यांची विक्री झाली असून त्यातून चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल गेल्या दहा वर्षातील विक्रमी आहे. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील अनेक बाजार रद्द झाल्याने यावर्षी घोड्यांचे आवक कमी झाली होती मात्र बाजारात तेजी असल्याने मोठ्या उलाढाली झाल्याचे जाणकार सांगतात. यावर्षीच्या यात्रेत सर्वाधिक महाग घोडा पंधरा लाख रुपयाला विक्री झाल्याची नोंद शहादा बाजार समितीकडे आहे.
गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठी उलाढाल
सारंगखेडा घोडेबाजारात गेल्या दहा वर्षातील मोठी उलाढाल झाली असून आवक कमी असून ही 1700 पैकी 900 घोड्यांची विक्री झाली आहे. त्यातून बाजार समितीत चार कोटीची उलाढाल झाल्याची नोंद आहे. घोड्यांच्या खरेदी विक्रीचे काही व्यवहार बाजार समितीच्या बाहेरही होत असतात त्यांची नोंद होत नसल्याने घोडेबाजार मधील उलाढालीचा नेमका अंदाज येत नसतो मात्र बाजार समितीत नोंद असलेल्या व्यवहारातून 4 कोटीची उलाढाल झाली आहे.