नंदुरबार : 'संजय राऊत मानसिक रुग्ण, त्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही', असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीकास्त्र सोडलं आहे. विकसित भारत संकल्पना यात्रेच्या आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर भाष्य केलं. दरम्यान यावेळी बोलताना नारायण राणेंनी संजय राऊतांवर घणाघातील टीका देखील केलीये.
संजय राऊतांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा व्हिडिओ ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत हे मानसिक रुग्ण असून ते सध्या डीप्रेशनमध्ये जात आहेत,त्यामुळे अशा वक्तव्यांवर न बोललेलचं बरं, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. राऊतांनी बानकुळेंचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर राऊतांवर भाजप नेत्यांनी एकच टीकेची झोड उठवली.
'राऊतांनी जनहिताचे प्रश्न कधी उपस्थित केले का?'
राऊतांनी कधी जनहिताचे प्रश्न उपस्थित केले का, असा सवाल देखील यावेळी नारायण राणेंनी उपस्थित केला. निलेश राणेंनी देखील राऊतांवर या मुद्द्यावरुन टीकास्त्र सोडलं. संजय राऊत रिकामटेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात. त्यांचाच एक दिवस पिक्चर येईल. त्यांची जी भानगड आहे, स्वतःच किती झाकून ठेवलं ते येणाऱ्या काळात आम्ही दाखवू शकतो, असं वक्तव्य निलेश राणेंनी केलं.
ठाकरेंकडे नवे आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही - नारायण राणे
आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर देखील नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे 16 चे 160 आमदार होतील असं वक्तव्य केलं. यावर नारायण राणेंनी म्हटलं की,सोबत असलेले 16 चे 10 होऊ नयेत याची काळजी घ्यावी. सध्या ठाकरेंकडे नवीन आमदार निवडून आणण्याची क्षमता नसून ते कशाच्या आधारावर बोलतात, हा ही एक मोठा प्रश्न आहे.
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण द्या - नारायण राणे
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्दा जोर धरु लागलाय. त्यावर नारायण राणेंनी बोलताना म्हटलं की, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण द्यावे. मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे या मताचा मी असून घटनेला धरूनच आरक्षण दिले जाईल. कुणबी नोंद संदर्भात निर्णय घ्यायला राज्य सरकार सक्षम असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.