Nandurbar Agriculture News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना (Crop) फटका बसत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Rain) आणि ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील (rabi season) हरभरा पीक (Gram crop) धोक्यात आलं आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  त्यामुळं आता शेतकऱ्यांसमोर (Farmers) दुबार पेरणीच्या संकट उभं राहिलं आहे.


 हरभऱ्याची रोपं मरत असल्यानं दुबार पेरणीचं संकट


नंदूरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात  हरभऱ्याची मोठी पेरणी करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळं हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरभऱ्याची रोपं मरत असल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभं राहिलं आहे. मागील वर्षी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्यानं यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिल्याचं चित्र होते. मात्र, नैसर्गिक संकटामुळं शेतकऱ्यांनी टाकलेलं भांडवलही निघणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.


नुकसानीचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी


हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका बसणार आहे. तर काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हरभऱ्याची रोपे मरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मर रोगामुळं शेतकऱ्यांवर दुहार पेरमीचं मोठे संकट उभं राहिलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


आधीच खरीपात अतिवृष्टीचा फटका, त्यात आता पुन्हा....


आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक पावसामुळं वाया गेली होती. यामध्ये सोयाबीन, कापूस, फळबागा या पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामातील पिकांवर होत्या. मात्र, रब्बी हंगामातील पिकांना बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत असल्याचं दिसत आहे. रब्बी हंगामातही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी हातबल झाला आहे.