Nandurbar News : सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) दुसऱ्यांदा नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असली तरी महसूल कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा (Staff Strike) राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सोमवारी (13 मार्च) रात्री आवकाळी पावसाने झोडपले होते. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून एक आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असून पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण होत नाही, तोच दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने मोठ नुकसान केलं आहे. कृषी विभागाने नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेतला आहे. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन (Old Pension) लागू व्हावी यासाठी संपावर गेले असून, शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.
पंचनाम्यांना ब्रेक
सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मदत करावी....
अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेले गहू, ज्वारी, हरभरा, केळी, पपई आणि मिरची तसेच शेतात पडून आहे. जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतीमाल तसाच पडून आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झालेला शेतीमाल पंचनामे होण्याचा अगोदर काढून घेतला तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती आहे. पंचनामे होत नसल्याने एकीकडे झालेले नुकसान तर निसर्गामुळे झालेले नुकसान असा दुहेरी मार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने काढून घेतला आहे. त्यातच संपाच्या मानवनिर्मित संकटाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून जिल्ह्यात पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान पाऊस पडण्याचा विभागाचा अंदाज आहे. यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात घट येण्याची शक्यता आहे. 15 मार्च ते 19 मार्च दरम्यानही पावसाची शक्यता असून तुरळक पावसाची शक्यता आहे. या काळात ढगाळ वातावरण राहून वाऱ्याचा वेग वाढू शकतो. 15 रोजी ताशी 8 किलोमीटर, 16 रोजी ताशी 12 किलोमीटर, 17 रोजी 11 तर 18 आणि 19 मार्च रोजी ताशी 10 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या काळात दिवसाचे तापमान सरासरी 33 ते 36 अंश तर रात्रीचे तापमान 17 अशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान होऊन किडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.