Nashik News : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा (Staff Strike) राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) काल (14 मार्च) दोन ते तीन तास केस पेपर काढण्यासाठी च्या रांगा लागल्या होत्या तर आजही पहाटेपासून रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र कर्मचारी उपस्थित नसल्याने आजही रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.


राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप सुरु आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यभरातील वॉर्ड बॉय, नर्सेस आणि इतर कर्मचारी देखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील कामे खोळंबली आहेत. याचा फटका रुग्णांसह नातेवाईकांना बसत आहे. नाशिक (Nashik) विभागातील महत्त्वाचं रुग्णालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील संपात सहभाग घेतल्याने रुग्णांसह नातेवाईकांना मोठी झळ बसली आहे.


दरम्यान कालपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी कामे थांबली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे या संपात रुग्णालयातील कर्मचारी देखील सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. काल केस पेपर काढण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागलं होतं. त्यानंतर आज देखील पहाटेपासून जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल 2-3 तास रांगेत उभे राहून केस पेपर मिळाले नाहीत, डॉक्टर नाही म्हणून उपचार झाले नाहीत. त्यामुळे आज पहाटेपासूनच रुग्ण आणि नातेवाईक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाबाहेर येऊन बसले आहेत. हिंगोली, जालना, जळगाव अशा दूरच्या जिल्ह्यातून पेशंट आले आहेत. 


उपचार देणार तरी कोण? 


हिंगोली, जळगाव, जालना आदी जिल्ह्यातील रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून कर्मचारी नसल्याने उपचार देणार तरी कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून आता संप पाहून आजारी पडायचं का? असा सवालही उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी हिंगोली इथून आलेले आजोबा म्हणाले की, "काल दुपारी छत्रपती संभाजीनगर इथून नाशिकला निघालो. आज पहाटे नाशिकला पोहोचून जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र इथे येऊन पाहतो तर एकही कर्मचारी नाही त्यामुळे आता उपचार होतो की नाही हा प्रश्न आहे?" संप असल्याचं माहित असतं तर आलोच नसतो अशी प्रतिक्रिया या आजोबांनी दिली.