Nandurbar News : ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना ज्या मिनी मंत्रालयाकडून राबवल्या जातात, त्या मिनी मंत्रालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar ZP) वतीने संबंधित कार्यालयात जाऊन झाडाझडती घेण्यात आली. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांच्या कामांसाठी खोळंबा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज गावित यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आणि विविध सभापतींना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची झाडाझडती घेतली. अध्यक्षांनी अचानक भेट दिल्याने काही विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केल्याने आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असल्याने नागरिकांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


नागरिकांची कामं वेळेवर होत नसल्याने अध्यक्षांची अचानक भेट


मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदे कर्मचारी मोठे संख्येने कार्यरत आहेत. मात्र काही कर्मचारी दुपारनंतर दांडी मारत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेवर काम होत नसल्याने यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना अचानक भेट दिली. कोण गैरहजर आहे का याची माहिती जाणून घेतली त्यासोबत जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांच्या अडीअडचणी देखील विचारपूस केल्या आहेत. अध्यक्ष यांनी विभागांचे हजेरी पुस्तक याची देखील तपासणी केली आहे. कुठल्या भागातील नागरिकांचे काम अपूर्ण आहे, याची संपूर्ण माहिती घेतली. 


प्रलंबित फाईली आणि इतर कामे तातडीने निकालात काढा : अध्यक्ष


दरम्यान तपासणी वेळी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. कार्यालयातील प्रलंबित फाईलींची माहिती घेण्यात आली. तसेच विविध विभागातील कारभाराबद्दल वारंवार का तक्रार येत आहेत, असा सवाल करण्यात आला. फाईल थांबवल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रलंबित फाईली आणि इतर कामे तातडीने निकालात काढा, अशा सूचना देखील यावेळी देण्यात आला. तसेच पुन्हा तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन किती कर्मचारी उपस्थित आहेत? किती लोक सुट्टीवर गेले आहेत? याची दखल घेण्यात आली. या कार्यालयात एकही ड्रॉप आउट्स आढळले नाही, पण परंतु एक दोन कर्मचारी वैयक्तिक कारणांमुळे सुट्टीवर होते. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कारण कार्यालयात काम करायला कमीत कमी वेळेत जास्तच जास्त काम कशा पद्धतीने होईल किंवा कशा पद्धतीने करुन घ्यायचा आहे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. निश्चितपणाने त्याच्यासाठी ही तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ज्या काही समस्या आढळून येतील, त्या लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करु, नागरिकांची कामे कशी काम लवकरात लवकर होतील, अशा पद्धतीने नियोजन असल्याचे नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.