Nandurbar News : एकीकडे पोलीस प्रशासन गुन्हेगारांना सळो कि पळो करत असताना पोलिसांचं निर्भया पथकही (Nirbhaya Pathak) रोडरोमियोंना चांगलाच दणका देत आहे. नंदुरबार (Nandurbar) शहरात गेल्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या निर्भया पथकाचा दरारा वाढत असून अशातच आज निर्भया पथकाने माणुसकीचे दर्शन नंदुरबार वासियांना घडले. 


शाळा महाविद्यालयाबाहेर टवाळकी करणाऱ्या रोडरोमियोंना धडा शिकवण्यासाठी निर्भया पथक राज्यभरात कार्यरत आहेत. नंदुरबार शहरात देखील शाळा (School) सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रोडरोमियो कल्ला करत असतात. या रोडरोमियोंना आळा घालण्यासाठी वर्षभरापूर्वी नंदुरबार शहरात निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली असून आतापर्यंत अनेकांवर कारवाई करत समुपदेशन केले आहे. अशातच आज शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथक कारवाई करत असताना वृद्ध महिलेला दुचाकींचा धक्का लागून जखमी झाली. यावेळी निर्भया पथकाने तातडीने महिलेस उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून व्यवस्थित रित्या तिच्या राहत्या घरी पाठविण्यात आले. 


नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात एका वृद्ध महिला रस्त्यावरून जात असताना तिला एका मोटर सायकल स्वराचा धक्का लागला. यात ती खाली कोसळल्याने जखमी झाली. त्या महिलेला निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला. एका खाजगी वाहनातून प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमी महिलेला तिच्या गावी पाठविण्यात आले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीची शहरभर चर्चा होती. या महिला कर्मचाऱ्याचा गणवेशाच्या आत असलेला माणुसकीचा झरा पाहून उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. 


दरम्यान नंदुरबार शहर व ग्रामीण भागात वाढलेल्या छेडछाडीविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली असून शहरातील बसस्थानक, कॉलेज रोड, भाजीमार्केट, शाळाबाह्य व शाळेतील विद्यार्थ्यांवर निर्भया पथक करडी नजर ठेवून असून रोडरोमिओंना अटकाव करण्यासाठी सिव्हील ड्रेसवर शहरातून गस्त घालत आहे. यामध्ये चार महिला पोलिस व दोन पुरूष पोलिस यांचा समावेश आहे. मोटारसायकलवर ट्रिपलशीट फिरणारे, रस्त्यावरून जाताना आवाज करणारे रोडरोमिओंवरही हे पथक कारवाई करत आहे. 


नंदुरबार शहरातील निर्जन ठिकाणांबरोबरच चौका चौकातही आणि कॉलेज परिसरात कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटतेवेळी दुचाकी स्वार अनेकदा हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाने अनेक हुल्लडबाज तरुणांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. त्यानंतर अशा तरुणांबरोबरच युवतींनाही समज निर्भया पथकाकडून दिली जात आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात आणून पालकांना माहिती दिली जाते. त्यानंतर या मुलांचे समुपदेशन केले जाते. पालकांना देखील याबाबत सजग केले जाते. पालकांना आपल्या मुलाकडे लक्ष द्या, मुलगा कोणाच्या संगतीत आहे. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, मुलांना चांगल्याची संगत करण्यास सांगा अशा सुचना देण्यात येतात.