Nandurbar Latest News: मित्रांशी किंवा कुणाशीही मजाक मस्करी करताना त्याचं काहीतरी लिमिट असणं गरजेचं आहे. अन्यथा चेष्टेचा विषय अनेकदा अंगलट येतो. कधी कधीतर अशी मस्करी एखाद्याचा जीव देखील घेऊ शकते. साक्री तालुक्यातील एका कंपनीत अशी एक खळबळजनक घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील (Dhule Sakri News) छडवेल कोर्डे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  तरुणाच्या गुदद्वारात त्याच्याच सहकारी मित्रांनी एअर कॉम्प्रेशर प्रेशर मशीननं (Air Compressor Machine) प्रेशर नळी लावून मस्करीच्या नादात हवा भरल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे. तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे.


 तुषार निकुंभच्या सहकारी मित्रांनी एअर कॉम्प्रेशर प्रेशर मशीननं (Air Compressor Machine) प्रेशर नळी लावून मस्करीच्या नादात त्याच्या गुदद्वारामार्गे हवा भरली. यानंतर तुषारची प्रकृती बिघडली.  तुषारला त्रास होऊ लागल्याने त्यास तात्काळ नंदुरबार येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तेथून नातेवाईकांनी सुरत येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाच्या मित्रांनीच हा सर्व प्रकार मजाक मस्करीत केल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.


तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी


दरम्यान या तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका निजामपूर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्यावर उभी करत रास्ता रोको सुरू केला होता. तरुणाच्या या मारेकऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून. उर्वरित संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केली होती. अखेर ठोस आश्वासनानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले आणि रात्री या तरुणावर अंत्यसंस्कारचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर छडवेल कोर्डे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. एखाद्यासोबत केलेली चेष्टा मस्करी कशी आणि किती प्रमाणात असावी याबाबत खरोखर विचार करणं गरजेचं आहे. साक्रीतील या घटनेनंतर यावर गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या