Nanded News : मनगटापासून वेगळा झालेला हाताचा पंजा पोलिसांनी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून नेला आणि डॉक्टरांनी मात्र जोडून देऊन मजुरी व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाला जीवनदान दिल्याची घटना नांदेडमध्ये (Nanded) समोर आली आहे. त्रिशरण कैलास थोरात (वय 37 वर्षे) असे जखमी तरूणाचे नाव आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी तरोडा नाका येथे शेतकरी चौकात दुचाकीचा धक्का लागल्यामुळे काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीत त्रिशरण थोरात या गरीब इसमाला गुंडांच्या टोळक्याने मारहाण केली. यावेळी सर्रास तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्रिशरणच्या डाव्या हाताचा पंजा तुटून पडला होता. 


मनगटापासून वेगळा झाला हाताचा पंजा


या घटनेची माहिती हाकेच्या अंतरावर असलेल्या भाग्यनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सूर्यमोहन बोलमवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अबिनाशकुमार यांना देण्यात आली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे घटनास्थळी पोहचले. तेथील दृष्य पाहून ते विचलित झाले. कारण, थोरात या तरुणाचा हात मनगटापासून तुटून बाजूला पडला होता. 


पोलिसांनी पिशवीतून नेलेला पंजा डॉक्टरांनी जोडून दिला


घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कोणताही विचार न करता त्यांनी त्रिशरण थोरात याचा डाव्या हाताचा पंजा एका कॅरीबॅगमध्ये टाकून त्याला पोलीस जीपमध्ये विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठविलं. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे आपल्या अधिकाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले. पण, विष्णुपुरी येथील रुग्णालयात तुटलेल्या पंजाच्या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे श्रीकृष्ण कोकाटे यांनी यशोसाई हॉस्पिटलचे अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. देवेंद्र पालीवाल यांच्याशी संपर्क साधून शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्रिशरणला घेऊन येण्यास सांगितले. 


मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला


गरीब मजूर असलेल्या त्रिशरणच्या उपचाराची सोय कोकाटे यांनी केली. शेवटी शस्त्रक्रियेनंतर मनगटापासून तुटलेला हात पुन्हा एकदा जोडण्यात आला. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. देवेंद्र पालीवाल यांनी पैसे देखील घेतले नाही. शक्य झाल्यास जखमी गरीब तरुणाला मदतीचे आवाहन केले आहे.


तब्बल 8 तास शस्त्रक्रिया चालली


शासकीय रुग्णालयातून त्रिशरण थोरात याला यशोसाई हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉ. देवेंद्र पालीवाल, डॉ. सुशांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन 8 तासांची शस्त्रक्रिया करुन थोरात याचा मनगटापासून तुटलेला पंजा हाताला जोडला. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. शनिवारी त्रिशरण हाताची बोटे हलवू लागला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही धो धो पाऊस बरसला; 13 मंडळात अतिवृष्टीची नोंद