Unseasonal Rain In Marathwada : राज्यात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत असून, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) गारांचा जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. तर, मराठवाड्यावर आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


नांदेड शहर व तालुक्यात रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळाले. तसेच आणखी आठ दिवस अशीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


सुपारी पेक्षाही मोठ्या गारा...


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एक धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस, जवळगाव, विरसनी, कामारी, सरसम यांसह अनेक गाव परिसरात झाला आहे. तर आंब्याच्या झाडाला आलेलं मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे.


अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात...


एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सुरुवातीला वादळी वारे आले, त्यानंतर थेट गारांचा पाऊस झाला. यावेळी सुरुवातीला खारकी बोराएवढी व त्यानंतर सुपारी एवढी व अर्ध्या तासानंतर जोरदार पाऊस झाला. एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.


तातडीची मदत देण्याची मागणी...


हिमायतनगर शहर व सर्व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकरी राजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात गारपिटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल