Nanded News : सेंद्रिय शेतीतील उत्पादने विषमुक्त असल्याने अशा पद्धतीच्या शेतीचे प्रयोग ठिकठिकाणी होत आहेत. नांदेड (Nanded) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (ZP School) विद्यार्थी अभ्यासासोबत आता सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) धडे गिरवत आहेत. ज्यात शाळेच्या आवारात या विद्यार्थ्यांनी सांडपाण्यापासून परसबाग फुलवली आहे. शाळेतील या परसबागेतून उगवलेल्या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात उपयोग होत आहे. दरम्यान ही परसबाग सांडपाण्याचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन फुलवली आहे.


परसबागेतील सेंद्रिय भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात 


जिल्हा परिषदेच्या शाळेतील परसबागेतून विद्यार्थ्यांना भाजी लागवड, जैविक खत, बियाणे, औषधी, शेती मशागत, सेंद्रिय शेतीची माहिती दिली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील धामदरी येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळेतून अभ्यासक्रमाबरोबर शेतीविषयक पायाभूत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आवारात परसबाग फुलवली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून सेंद्रिय शेतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. या परसबागेतील सेंद्रिय भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात होत आहे. शाळेतील कमी जागेचा वापर करुन ही बाग फुलवली असून उत्पादन आणि ज्ञान असे दोन्ही उद्देश सफल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.


शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा प्रयोग


विद्यार्थ्यांना सकस, ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात, भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने धामदरी शाळेच्या आवारातच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, कांदे, पालक, कोथिंबीर, मेथीची लागवड करुन परसबाग तयार केली आहे. ज्यात हंगामानुसार शाळेच्या आवारात भाजीपाला लागवड केली जात असून विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाज्या शालेय पोषण आहारामध्ये वापरल्या जात आहेत.


शिक्षकांची कल्पना, विद्यार्थ्यांची मेहनत


दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील रसायनविरहित भाज्या लागवडीचे संस्कार बालवयातच विद्यार्थ्यांवर होत असल्याने हा परसबागेचा उपक्रम आदर्श ठरत आहे. ज्यात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून दिलेले शिक्षण अधिक प्रभावी ठरत आहे. यासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्याच्या एकत्रित कृतीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी जेवणानंतर हात धुतल्याने शाळेच्या नियमित व्यायामही आवारात पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरत होती. अन्नकण असलेल्या या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी शिक्षकांना परसबागेची कल्पना सुचली. त्यानुसार टोमॅटो, चवळी, पालक, कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा, पालेभाज्यांसह, पेरु, केळी आदींची शाळेच्या आवारातच लागवड केली. मशागतीपासून लागवड, निगा, काढणीपर्यंतच्या प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करत आहेत. मुख्याध्यापक बळीराम शिंदे, शिक्षक राम पतंगे, रवींद्र जांभळे, धम्मदीप जोंधळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.