Nanded News: अनेकदा मुलं मोठी झाल्यावर आपल्याच आई-वडिलांना घराबाहेर काढतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizens) सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टिने अनेक भावनिक कंगोरे पुढे येतांना आपण पाहतो. अशात कुटुंबातील आजी-आजोबांचे योगदान लक्षात घेता अंगणवाडी पासून शाळेपर्यंत आजी-आजोबांनाही विविध कार्यक्रमांना निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षण विभागाला दिले. अशा उपक्रमातून पाल्यांच्या मनातही ज्येष्ठांप्रती आदरयुक्त भावना वृद्धीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  


ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, आपल्या कुटुंबातील पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती या आग्रही असतात. त्यामुळे कुटुंबातील आजी-आजोबांचे योगदान लक्षात घेता अंगणवाडीपासून शाळेपर्यंत आजी-आजोबांनाही विविध कार्यक्रमांना निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवला पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 


दरम्यान जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात दर बुधवारी दुपारी 12 ते 2 कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव ज्येष्ठांच्या वैद्यकिय सेवा-सुविधांबाबत तात्काळ उपचार व्हावेत यादृष्टिने सर्व शासकीय रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या कालावधीत ज्येष्ठांच्या उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांनुसार सर्व तपासण्या केल्या जातील. विशेषत: ज्येष्ठांमध्ये फ्रोजन शोल्डर आणि इतर आजाराच्या तक्रारी असतात. त्यासाठी उपलब्ध सुविधेनुसार परिपूर्ण सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.


ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी लवकरच नाना-नानी पार्क येथील केंद्र होईल पूर्ववत


ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी मनपा व त्या-त्या नगरपरिषदांनी एक करमणुकीचे केंद्र विकसित करावे अशी मागणी आहे. त्यादृष्टिने नाना-नानी पार्क येथे पूर्वीचे केंद्र पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर चौफाळा, सिडको याठिकाणी शासनाच्यावतीने वेगळा निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. 


ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सेल 


ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता व कौटुंबिक अथवा इतर वादाच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार 112 या दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही गरजू नागरिक, महिला अथवा बालकांना केव्हाही संपर्क साधून मदतीची मागणी करता येते. याच्या नियोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याचबरोबर कोणत्याही पोलीस स्टेशनला मदतीसाठी केव्हाही नागरिकांना जाता येईल. जिल्ह्यात या सेल मार्फत आज पर्यंत एकुण 39 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 13 प्रकरणांत तडजोड करण्यात आली. पोलीस स्टेशनला 4 अर्ज वर्ग करण्यात आले. सहा प्रकरणात मा. न्यायालयात दाद मागवून समज पत्र देण्यात आले. वरील सर्व अर्ज सद्यस्थितीत निकाली काढण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


निजामाच्या जोखडातून मुक्तीस 75 वर्षे पूर्ण; पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात हल्ल्याची साक्ष