नांदेड : देशविघातक कृत्य करणाऱ्या पाकिस्तानमधील एका व्हॉट्सॲप ग्रुपशी कनेक्ट असणाऱ्या आरोपींसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला तपास यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. नरसी येथील 19 वर्षीय शेख शकील शेख सत्तार याला गुजरातमधील सुरत येथील डीसीबी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 


नांदेड पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानमधील व्हॉट्सॲप ग्रुपशी कनेक्ट असणाऱ्या आरोपींसोबत चॅटिंग आढळल्याच्या संशयावरून या युवकास गुजरात पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.  


अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्यांची चर्चा


पाकिस्तानमध्ये जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप वकास आणि सरफराज डोगर हे दोघेजण चालवतात. या ग्रुपमध्ये गुजरातमधील सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहार मधील शहनाज हे दोघे सामील आहेत. या आरोपींनी मिळून सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे राजासिंह, सुदर्शन वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.


परदेशातून शस्त्रे आणण्यासंबंधी चॅटिंग


परदेशातून शस्त्रे विकत आणण्यासाठी या ग्रुपमध्ये चॅटिंग झाल्याचेही आढळून आले. या आरोपींच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमध्ये शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यावरून गुजरात पोलिसांनी नरसी येथून शेख शकील शेख सत्तार याला ताब्यात घेतले आहे.


यासंबंधी माहिती देताना नांदेड पोलिसांनी सांगितलं की, एक 18 ते 19 वर्षांचा नरसी येथील मुलगा हा पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी कनेक्ट होता. त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते पुढील तपास करत आहेत. या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर राष्ट्रविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गु्न्हा नोंद करण्यात आला असून अनेकांवर पाळत ठेवण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: