Nanded News Update : नांदेड पोलीस खात्यात पोलीस जमादार म्हणून ( Nanded women police ) मनाठा येथे कार्यरत असणाऱ्या वर्षा पवार यांनी लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. बीड येथील पोलीस कॉन्स्टेबल ललित साळवे यांचं उदाहरण देत आपल्यालाही लिंग बदल शस्त्रक्रियेची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वर्षा पवार यांनी केली आहे.  


वर्षा पवार या सध्या नांदेडमधील मनाठा येथे पोलीस जमादार म्हणून कार्यरत आहेत. शरीरात नैसर्गिक बदल झाल्यामुळे वर्षा यांना लिंग बदल करून पुरूष व्हायचं आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या देखील केल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी देखील दिली आहे. परंतु, त्यांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही त्यांना प्रशासकीय परवानगी मिळत नसल्यामुळे वर्षा यांनी पत्र लिहून थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे लिंग बदल शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 
 
मध्यमवर्गीय कुटुंबात स्त्री म्हणून जन्म घेतलेल्या वर्षा या स्त्री असल्या तरी त्यांना आपल्यात पुरुषी भावना असल्याची कुमार वयातच जाणीव झाली. पण कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक अडचण आणि सगेसोयरे यांच्यासह कुटुंबाच्या आडकाठीमुळे तब्बल वयाची 36 वर्ष पूर्ण झाली. वडिलांच्या निधनानंतर  2005 मध्ये त्या अनुकंपावर पोलीस दलात भरती झाल्या. गेल्या अनेक वर्षापासून शरीराने स्त्री असून पुरुष असल्याच्या भावना येत असल्याने त्यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये  मानसिक दृष्ट्या त्या तंदुरुस्त असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यानंतर वर्षा या लिंग परिवर्तन करून पुरुष होण्यास समर्थ असल्याचे सेंट जॉर्ज हॉस्पिटलने देखील विविध चाचण्या करून लिंग बदल करणे योग्य असल्याचा अहवाल दिला आहे.


रूग्णालयाने परवानगी दिल्यानंतर देखील प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या दोन वर्षापासून त्या लिंग बदल शस्त्रकियेसाठी धडपड करत आहेत. यासाठी त्यांनी डीजी ऑफिस मुंबई, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या मार्फत पत्रव्यवहार केले. परंतु, त्यांना अद्याप कोणताही सकारात्मक प्रसितसाद मिळाला नाही. राज्य सरकारकडे लैंगिक समस्या आणि लिंग ओळखीबाबत कुठलेही धोरण नसल्याने लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळेच वर्षा यांनी बीड येथील पोलीस कॉन्स्टेबल ललित साळवे यांचे उदाहरण देत गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे. 


बीडच्या ललिता यांना मिळाली होती परवानगी


बीड पोलीस दलात 2010 मध्ये भरती झालेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. ललिता पोलीस दलात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली खरी पण, त्यांनतर शरीरात महिलेपेक्षा वेगळे बदल तिला जाणवू लागले. त्यामुळे तिने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना सप्टेंबर 2017 मध्ये अर्ज करुन आपणास पुरुष होण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज केला होता. मात्र हा विषय जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्यांनी ललिताचा अर्ज राज्याचे पोलीस महासंचालकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला होता. पण पोलीस महासंचालकांनी लिंग बदल करुन पोलीस दलातील नोकरी कायम ठेवण्याची तिची मागणी फेटाळली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्मिळ केससंदर्भात सहानुभूतीने विचार व्हावा, असा आदेश दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गृहखात्याने याप्रकरणी कायदेशीर मतं मागवली होती. 


ललिता साळवे शरीरातील जैविक बदलांशी सामना करत आहे. ही नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगला जाणं आवश्यक आहे. विशेष केस म्हणून तिच्या मागणीला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे लिंगबदलानंतरही ललिता पुढील काळात नोकरीत कायम राहू शकेल, अशा आशयाचं पत्र पोलीस अधीक्षकांनी दिलं होतं. त्यानंतर तिची लिंगबदल शस्त्रक्रिया झाली आणि नोकरी देखील कायम राहिली. आता याच गोष्टीचा आधार घेत वर्षा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लिंग बदल शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे.