नांदेड : परभणीतील गाजलेल्या 'मानवत मर्डर' पद्धतीचा नरबळीचा गुन्हा नांदेडमध्येही घडता घडता राहिल्याचा संशय आहे. एका सात वर्षीय मुलीला गावातीलच एका महिलेने तिच्या घरी दोन दिवस डांबून ठेवलं होतं. अंधश्रद्धेच्या कारणातून नरबळीसाठी तिचे अपहरण करण्यात आलं होतं असा संशय वर्तवण्यात येत आहे. नरबळीसंबंधी अजून ठोस असा पुरावा मिळाला नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील परांडा या गावातून प्रांजली कदम ही सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. 20 जानेवारी रोजी प्रांजली शाळेतून बाहेर पडली आणि बेपत्ता झाली होती. दोन दिवसानंतर ती मुलगी गावातच मुलगी सापडली. गावातील 55 वर्षीय महिला शोभाबाई गायकवाड हिने त्या मुलीला दोन दिवस घरात डांबून ठेवले होते. 


नरबळीसाठी अपहरण केल्याचा संशय


या प्रकरणी मुलीच्या पालकांनी माळाकोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अधिक तपास केला असता, 20 जानेवारीला सायंकाळी साडे चार वाजता प्रांजलीला दोन दुचाकीस्वारांनी उचलून नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता आरोपी शोभाबाई गायकवाड हिचे नाव समोर आलं. 


पोलिसांनी शोभाबाई गायकवाडच्या घराची झाडाझडती घेतली आणि तिच्या घरी बेपत्ता मुलगी सापडली. या प्रकरणी पोलिसानी शोभाबाई गायकवाड, तिचा नवरा शेषराव गायकवाड आणि मुलगा चंद्रकांत गायकवाड यांना ताब्यात घेतले. मुलीला डांबून ठेवण्यामागे त्यांचा काय हेतू होता याचा तपास सुरु आहे. 


अंधश्रद्धेच्या कारणावरून मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे. अघोरी प्रकार किंवा नरबळीसाठी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा आहे . मात्र नरबळी बाबतचा ठोस पुरावा अजून सापडलेला नाही. तिन्ही आरोपी अटक असून सखोल तपास सुरु असल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 


ही बातमी वाचा :