Nanded Rain Update : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अनेक भागात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातील सगळ्या रस्त्यांना तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनपाने नालेसफाईच्या नावाने कागदी खेळ खेळल्याने नांदेडकरांना याच पाण्यातून रस्ता काढावा लागतोय. विशेष म्हणजे अनेक रस्ते खोदून ठेवलेले असल्याने पावसात अपघातांची संख्या वाढलीय. तर ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. 






नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहे. दरम्यान तालुक्यातील इस्लापूर गावात पावसाचे पाणी घुसले आहे. तर नदी नाल्यांना पुर आल्याने पाण्यात न उतरण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तर नागरिकांना प्रशासनाने आवाहन करुनही बेल्लोरी नाला पुलावर काही लोकं धोकादायक प्रवास करत आहेत. दरम्यान यावेळी एक व्यक्ती वाहून गेला असून, प्रशासनातर्फे शोधकार्य सुरु आहे. तर इस्लापूर गावात स्थानिक तलाठी व प्रशासनाची टीम गावांत हजर आहे. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या इस्लापूर येथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर मुदखेड नांदेड मार्ग पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहे. तर मन्याड नदीच्या पुराने देगलूर व बिलोली भागातील अनेक गावात पाणी घुसले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 






नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत प्रशासनाची माहिती 



  • नांदेड जिल्ह्यात 27 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील 1 , भोकर तालुक्यातील 1, किनवट तालुक्यातील 5 अशा एकूण 7 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.

  • मौजे सिंगारवाडी व सुंगागुंडा गावालगत असलेल्या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटल आहे.

  • चिखली खु. येथे नाल्याला पूर आला आहे.

  • इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासूनसंततधार पाऊस चालू आहे.

  • किनवट तालुक्यातील दुधगाव, प्रधानसांगवी या गावामध्ये काही घरे पाण्याखाली गेलेली आहेत.

  • सुवर्णा धरणाच्या बॅकवॉटर किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ गावात आल्यामुळे पाणी गावात शिरते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगाना येथील प्रशासनाशी समन्वय साधून सुवर्णा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात येऊन पाणी सोडण्यात आले आहे.

  • आप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकाजम ते शिवणी, आप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ धानोरा, शिवणी ते दयाळ धानोरा रोडवर पाणी आले आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद आहे.

  • मुखेड तालुक्यात रात्रीपासुन मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

  • उमरी तालुक्यात रात्री सरासरी 25 मिमी. पाऊस झाला. 

  • उमरी मुदखेड रस्ता रेल्वे पुलाच्या खाली पाणी असल्यामुळे मागील 8 दिवसापासून बंद आहे.

  • नायगाव तालुक्यात रात्रीपासुन रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

  • बिलोली शहरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

  • अर्धापूर तालुक्यात रात्रीपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

  • लोहा तालुक्यात रिमझिम स्वरुपाचा पाऊस आहे.

  • भोकर तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे

  • कंधार तालुक्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे.

  • हिमायतनगर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.

  • हिमायतनगर ते वडगांव व हिमायतनगर ते वडगांव तांडा दोन गावाचा संपर्क तुटला तरी दुसरा मार्ग गणेशवाडी

  • जिरोणा या मार्गाने हिमायतनगरसाठी वाहतूक चालू आहे. 

  • नांदेड तालुक्यात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

  • मुदखेड तालुक्यात सर्वत्र सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे.

  • देगलुर तालुक्यात रात्रभर व आताही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे

  • धर्माबाद मध्ये रात्रभर पाऊस चालू आहे आता पण रिमझिम पाऊस चालू आहे

  • धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे.

  • उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता बंद आहे. 

  • मौजा अब्दु लापूरते शिरूर येथील रस्ता बंद झाला आहे.

  • माहूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता. सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झालेला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


महिलेला वाचवताना स्कुटी घसरली अन् त्याचवेळी स्कूल व्हॅन आली, तरुणाचा जागीच मृत्यू; नांदेडमधील विचित्र अपघात सीसीटीव्हीत कैद