मुंबई : विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षही कामाला लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असून मनसेही मैदानात ताकदीने उतरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राजकीय भूमिका आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल यावर त्यांनी परखड भाष्य केलं. आज सत्तेत असलेल्या आणि यापूर्वी सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका बदलल्याचा इतिहास त्यांनी सांगितला. यावेळी, जनसंघ, इंदिरा गांधी, काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी बदलेल्या भूमिकांबद्दल माहिती दिली. तर, मनसे पक्षाने कधीही भूमिका बदलली नसल्याचं म्हटलं. आता, राज ठाकरेंनी भाजपच्या बदल्या भूमिकेवर केलेल्या टीकेवर भाजपनेही (BJP) पलटवार केला आहे.
भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर असल्याचा पलटवार भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. राज ठाकरेंचे मित्र असलेल्या आशिष शेलार यांनी राज ठाकरेंकडून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेवर राजकीय भूमिकेतून पलटवार केला आहे. राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर आम्ही तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही, असे म्हणत भाजपने भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राम मंदिर बांधताना, 370 कलम काढताना एक देश, एक निशाण, एक प्रधान हीच भूमिका आम्ही मांडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचं संविधान या संपूर्ण देशात एकदा लागलच पाहिजे, या भूमिकेत आम्ही तडजोड केली नाही. पोखरण अणुचाचणीवेळीही इतर देशांना काय वाटेत याचा विचार करत आम्ही तडजोड केली नाही. एनआरसी, सीएए यासारख्या विषयांतही भाजपने कधीही तडजोड केली नाही. केवळ स्थळ, काळ आणि आवश्यकतेनुसार जे घडलंय त्यातून आपण नेरेटीव्ह पसरवू पाहतात ते जनतेला अमान्य आहे. त्यामुळे, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन दिवसेंदिवस आहे, कारण राष्ट्रविचार आणि तत्वांशी आम्ही कधीच तडजोड केली नाही, यातून काहीतरी शिका हाच मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचेही आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्त्युतरादाखल म्हटले.
काय म्हणाले राज ठाकरे
स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली. सन 1975 साली आणीबाणीनंतर 77 साली झालेल्या निवडणुकीनंतर देशभरात इंदिरा गांधींचा पराभव झाला, राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं. जनता पार्टीत अनेक पक्ष होते त्यात एक जनसंघ होता. जनता पार्टीतील वादांमुळे पुन्हा इंदिरा जिंकल्या आणि मग भारतीय जनता पार्टी उदयास आली. अटलजींनी पक्षाची भूमिका बदलली, गांधीवादी समाजवाद आम्ही पाळू ही भूमिका घेतली, जनसंघ पुलोदमध्ये पवारांसोबत होता. 1978 पासून शिवसेनेनं काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेन एकही जागा लढवली नव्हती, पण काँग्रेससोबत सेनेची युती होती, असा गौप्यस्फोटच राज ठाकरेंनी केली. राजीव गांधींपुढे पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आपापल्या स्वार्थासाठी प्रत्येकानं भूमिका बदलल्या, मी कधी भूमिका बदलली?. या सर्वांना पत्रकार विचारणार नाहीत का भूमिका बदलली? आजचा दिवस ढकलायचा, काही का बातमी लागेना, असा टोला राज यांनी पत्रकारांना लगावला.