नांदेड : संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलीये. राज्यात कोविडच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था सुरळीत होती. हेच अधिकारी काम करत होते. त्यावेळी राज्याचा मृत्यूदर देखील कमी होता. पण आता आरोग्य व्यवस्था कशी खोळंबली हे पाहण्यासाठीच मी इथे आलो आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नांदेडच्या (Nanded) शासकीय विश्रामगृहाला भेट देऊन तिथल्या रुग्णांची चौकशी केली. तसेच त्यांनी यावेळी तिथल्या परिस्थिती देखील आढावा घेतला. तर या परिस्थितीला सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली. 


हा राजकीय स्टंट - आदित्य ठाकरे


अनेक राजकिय स्टंट देखील नांदेडमध्ये झाले. मूळ मुद्द्याला हात न घालता राजकीय स्टंट केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलाय. काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील अधिष्ठाता यांना शौचालय साफ करण्यास लावले होते. त्यानंतर राजकारण चांगलेच पेटले. तर अधिष्ठता यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. 


'सरकारने याची जबाबदारी घ्यावी'


रुग्णालयात औषधी उपलब्ध नाही, याचा दोष रुग्णालयाला देण्यात येत आहे. पण यामध्ये सरकारची काहीच जबाबदारी नाही का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, 'रुग्णालय परिसरात कचऱ्याची व्यवस्था नाही, मागील बिलं भरली नाही म्हणून लिफ्ट बंद, औषधं वेळेवर उपलब्ध नाहीत. या सगळ्या गोष्टी मंत्र्यांनी येऊन सोडवायला हव्यात. कारण यामध्ये सरकार कमी पडलं. जे डॉक्टर जीव तोडून काम करत आहेत, त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. '


'आम्ही राजकारण करायला आलो नाही'


'आम्ही राजकारण करण्यासाठी इथे आलो नाही. आरोग्य व्यवस्था बदलून लोकांचे आरोग्य चांगले व्हावे यासाठी आम्ही इथे आलो आहोत. राजकारण करायचचं असेल तर आम्ही मोर्चा किंवा आंदोलन केलं असतं. पण आम्ही तसं काही केलं नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यायला हवी होती. आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही. राजकीय चर्चा करण्यासाठी आलो आहोत. यामध्ये बदल होणं आवश्यक आहे', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवानंतर राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. तर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढण्यात आले. तर सत्ताधारी पक्षाकडून देखील यावर चोख उत्तर देण्यात आलं आहे. पण आता आदित्य ठाकरे यांच्या मागणीवर सत्ताधारी पक्षाकडून कोणती भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


Chitra Wagh : नांदेड घटनेतून राजकीय सलाईन घेऊन विरोधक वणवा पेटवताहेत; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर निशाणा