Nanded News : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीला शीतपेयातून विषारी द्रव्य पाजवून तिची हत्या (Murder) केल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रेयसीला विषारी द्रव्य पाजल्यावर स्वतः देखील विषारी द्रव्य प्राशन केल्याने या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 4 जुलै रोजी घडली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिया असे मृत तरुणीचे नाव असून, रोहिदास पद्माकर जाधव असे विष पाजणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


अधिक माहिती अशी की, लक्ष्मीबाई मारोती जाधव यांच्या पतीचे वीस वर्षापूर्वी निधन झाल्याने आपल्या मुला-मुलीसह लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे त्यांच्या आईकडे राहात होत्या. त्यांना 2 मुली व मुलगा आहे. मोठी मुलगी ही विवाहित असून, मुलगा पोलिस दलात आहे. दुसरी मुलगी सुप्रिया ही बी.ए प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान लक्ष्मीबाईचा सख्खा चुलतभाऊ पद्माकर जाधव हेही भोपाळवाडी येथे राहतात. तर त्यांचा मुलगा रोहिदास हा सुप्रियास अधूनमधून भेटायला घरी येत असे. ते दोघे अधूनमधून फोनवर बोलत असत व प्रत्यक्ष भेटतही असतं. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. दरम्यानच्या काळात रोहिदासच्या वडिलांनी आपल्या मुलाला तुझी मुलगी सुप्रिया हिला दे म्हणून लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु लक्ष्मीबाई आणि नातेवाईकांनी विरोध दर्शविला. 


दरम्यान 3 जुलै रोजी रात्री सुप्रिया एका खोलीत तर आई आणि आजी दुसऱ्या खोलीत झोपले होते.  तर 4  जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता लक्ष्मी यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी सुप्रियाच्या खोलीचे दार ओढून पाहिले असता ती दिसली नाही. त्यामुळे बाथरुममकडे जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. सुप्रिया सुप्रिया असा आवाज दिला असता, ती बोलली नाही मात्र बाहेर आली. दरम्यान याचवेळी बाथरुममधूनच रोहिदास जाधव हा बाहेर आला. वाड्याचे दार ओढून तो पळून गेला. लगेच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. त्यावेळी काय झाले, का उलट्या का होत आहेत असे लक्ष्मी यांनी विचारले असता रोहिदासने मला शीतपेयाच्या बाटलीतून विष पाजले असे सांगितले. 


दोघांना उलट्या सुरु झाल्या...


सुप्रियाला उलट्या होत असतानाच रोहिदासचा फोन आला आणि सुप्रियानेही तो फोन उचलला. तेव्हा रोहिदासने मी देखील विष प्यायलो आहे, मलाही उलट्या होत आहेत असे सांगितले. त्यामुळे लक्ष्मी यांनी लगेच सुप्रियाला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तसेच रोहिदासलाही त्याच्या आई-वडिलांनी दुसऱ्या वाहनात टाकून विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातच आणले. मात्र उपचारादरम्यान सकाळी 7.30 वाजता डॉक्टरांनी सुप्रियाला मृत घोषित केले. तर रोहिदासवर उपचार सुरु आहे. तर याबाबत लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात आरोपी रोहिदास पद्माकर जाधव याच्याविरुध्द 302 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded News: चक्क शालेय पोषण आहाराच्या खिचडीत शिजली पाल; 21 बालके रुग्णालयात, नांदेड जिल्ह्यातील घटना