Nanded News: नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क शालेय पोषण आहाराच्या खिचडीत पाल (Gecko) आढळून आली आहे. लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथील जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडीत पहिलीतील विद्यार्थिनीला खिचडीत मृत अवस्थेतील पाल आढळली. ही खिचडी शाळेतील 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली होती. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे 21 विद्यार्थ्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे दाखल करण्यात आले होते. या घटनेने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
अधिक माहिती अशी की, लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक जि.प.प्रा.शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी वाटप करण्यात आली होती. यावेळी हरभरा डाळ व खिचडी बनवण्यात आली होती. ही खिचडी काही विद्यार्थ्यांनी शाळेतच खाल्ली. तर काही जणांनी घरी डब्यात भरून घरी घेऊन जाऊन खाल्ली. त्यातील पहिलीत शिक्षण घेणारी आरुषी बेटकर या विद्यार्थिनीला खिचडीत मृत पाल आढळली. तिचे वडील शिवशंकर बेटकर हे घरीच असल्याने त्यांनी ही मृत पाल मुख्याध्यापक, शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली.
थोड्याच वेळात त्यातील खिचडी खालेल्या काही विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे चिमुकले रडू लागले. त्यातील 21 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी कापशी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. मुनेश्वर व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले. आरोग्य विभागाच्या पथकाने शाळेत येऊन उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार केले. मात्र दोन विध्यार्थी सोडले तर सर्वांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना रात्रीच सुट्टी देण्यात आली आहे.
एकच धावपळ उडाली...
नेहमीप्रमाणे शाळेत खिचडी वाटप करण्यात आली. दरम्यान यातील काही विद्यार्थ्यांनी खिचडी शाळेत न खाता घरी नेली होती. दरम्यान यातील एका मुलीने घरी खिचडीचा डब्बा उघडताच त्यात तिला मेलेली पाल दिसली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांना मिळताच त्यांनी खिचडी खालेल्या विद्यार्थ्यांनीची माहिती काढत त्यांच्या पालकांना याची महिती दिली. तसेच काही मुलांना उलटी, मळमळ पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने, खिचडी खालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे पालकांची चिंता वाढली आणि एकच खळबळ उडाली. जो-तो पालक आपल्या मुलाची काळजी करत होता. तसेच चिंता व्यक्त करत होता. पण वैद्यकीय विभागाने मुलांवर तत्काळ उपचार सुरु केले. त्यामुळे सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. तर सर्व मुलांची प्रकृती चांगली असून, कोणतेही चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर पालकांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded News : व्हॉट्सअॅप चॅटवरून वाद झाला, शिवसैनिकावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला