मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नांदेडमधील (Nanded) पोटनिवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड लोकसभा (Loksabha) पोटनिवडणुकीसाठी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रविंद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दौरा केला होता, त्यावेळी नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली होती. त्याचवेळी, येथील पोटनिवडणुकीतसाठी रविंद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आता, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने पत्र जारी करण्यात आले असून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, मेघालय येथील विधानपरिषद निवडणुकीसाठी जिंगजँक मरक यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून या 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, आता नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात असून अनेकांना उत्सुकता लागून आहे.  


वसंतरावंची गादी मुलगा चालवणार 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अचानक जाण्याने वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवानेच चालवावी असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. त्यानंतर, आज अधिकृतपणे दिल्लीतील काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणारी याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09  (Nanded MLA List)


किनवट विधानसभा - भीमराव केराम (भाजप)
हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (भाजप) - सध्या राज्यसभा खासदार 
नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)


हेही वाचा


लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक