नांदेड: नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण या गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात किरकोळ कारणावरून भावकीच्या लोकांनी शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली, असा आरोप करत एका वीस वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या (Nanded Crime News) करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ केला असून या व्हिडीओतून त्याने आपली कैफियत मांडली आहे. ही घटना उजेडात येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
घटणेपूर्वी व्हिडीओतून मांडली कैफियत
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील श्याम यशवंत जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने व्हिडीओ तयार करुन आणि धमकी देणाऱ्यांचे नावे घेवून कुष्णूर येथील तलावात उडी मारुन आत्महत्या केलीय. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. घटनेबाबत कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर कुंटूर पोलिस दाखल होऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान व्हिडिओ करून श्याम जाधव यांनी काही लोकांवर आरोप केले आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मी मारहाण सहन करू शकत नाही, म्हणून जीव द्यायला जात आहे, असं या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे. यामध्ये काही जणांची त्याने नावे घेतली असल्याने पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचं एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी (13 ऑक्टोबर) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा भोवळ येऊन मृत्यू झाला. शांताबाई शिवाजी मोरे (53, रा. भनगी, ता.जि. नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला आलेल्या या लाडक्या बहिणीचा मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रविवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातून हजारो महिला या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. नांदेडपासून जवळच असलेल्या भनगी येथील 50 हून अधिक महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या. यामध्ये शांताबाई मोरे यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री दुपारी येणार असल्याने आयोजकांनी महिलांना सकाळी दहा वाजता कार्यक्रस्थळी बोलावले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम तीन तास उशिराने म्हणजे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या