Farmer Success Story : सध्या शेतकऱ्यांचा रासायनिक पध्दतीने शेती करुन मोठया प्रमाणात शेतमाल उत्पादन करण्यावर भर असल्याचे चित्र आहे. मात्र रासायनिक खताच्या (Chemical Fertilizer) अतिवापरामुळे  जमीनीचा पोत बिघडताना पाहायला मिळत आहे. तसेच रसायने शेतीतील उत्पादनाद्वारे केलेले पिके नागरिकांच्या आहारात येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे टाळण्याच्या उद्देशातून सेंद्रीय शेतीला (Organic Farming) प्राधान्य देण्याचे आवाहन सतत शासनाकडून केले जात आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव देवराव पऊळ या दहावी शिकलेल्या शेतकऱ्यांने सेंद्रीय शेती व उत्कृष्ट गांडुळ खत निर्मिती करून त्यावर पिके घेऊन उन्नतीचा मार्ग शोधला आहे.  


रासायनिक खताच्या अतिवापरामुळे झालेले विषारी अन्न खायचे नाही, आपल्या ग्राहकांना विषमुक्त अन्न द्यायचे असा दृढ निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळे वडिलोपार्जित 15 एकर शेती त्यांनी रासायनिक मुक्त या ध्येयावर करत असून, यात आणखी 8 एकर शेतीची भर घातली आहे. आजच्या घडीला एकूण 23 एकर शेती ते सेंद्रीय पध्दतीने करत आहेत.  


गांडुळ खतातून वर्षाला 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न 


बळवंतराव यांनी रासायनिकमुक्त शेतीसोबतच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गांडुळ खत निर्मिती व्यवसायाची जोड दिली. सुरुवातीला त्यांनी स्वतःसाठी गांडूळ युनिटची उभारणी केली. मात्र 10 बेडपासून सुरु केलेला व्यवसाय 40 बेडवर पोहोचला. प्रत्येक बेडमध्ये 2 किला गांडुळे सोडली जातात. सेंद्रीय घटक लवकर कुजण्यासाठी 3 ते 4 किलो गुळ अधिक दोन लिटर दही अधिक 3 किलो हरभरा पीठ, 25 ते 30 लीटर पाणी असलेला द्रव बेडवर नियमित शिंपडला जातो. तीन महिन्याला एक बेडमधून जवळपास 1 टन गांडूळ खत तयार होऊ लागला आहे. 40 बेडमधून वर्षाकाठी निघणाऱ्या 40 टन खतापैकी काही खताचा वापर घरच्या शेतीत ते करतात. उर्वरित खत 40 किलोची बॅग तयार करुन प्रतिबॅग 600 रुपये दराने विक्री करतात. त्यांच्या खतास मोठी मागणी असून हिंगोली, परभणी, यवतमाळ व नांदेड येथून त्यांचे गांडूळ खत व शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकरी येतात. या गांडुळ खत विक्रीतून वर्षाकाठी ते 3 ते 4 लाख रुपये कमवत आहेत. 


स्वतः ची गोशाळा सुरु केली


या उद्योगाला शेणखत, मलमूत्र यांची आवश्यकता असते. या बाबी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन परवडत नसल्याने त्यानी पाच लक्ष रुपयांच्या राजस्थानी गाई विकत घेऊन गोशाळा सुरु केली. कृषी विभागाच्या एमआरजीएस फळबाग लागवड योजनेतून त्यांना पेरू लागवडीसाठी 70 हजार रुपये मिळाले. 278 झाडातून पहिल्या हंगामात त्यांना पेरु विक्रीद्वारे 40 हजार रुपये मिळाले. यासोबत ते सेंद्रीय उत्पादन, सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले धान्य घरुन विक्री करतात असे बळवंतराव पौळ यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded News : माळरानावरच्या यशस्वी फळबागेतून सुमनबाई मिळाला लखपतीचा मार्ग