Uddhav Thackeray : राज्यात आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होणार आहे. तर, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मालेगवाच्या आजच्या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.


राजकीय वातावरण तापलं


मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत हे मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मालेगावमध्ये ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचे बॅनर लागले आहेत.  मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आले आहे.


खेडनंतर आजची मालेगावात दुसरी सभा 


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलंच कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आदित्य ठाकरे, संजय राऊत पक्षाचे इतर नेत्यांचे राज्यभरात अनेक सभा, दौरे, मेळावे होत आहेत. यात उद्धव ठाकरे हे देखील मैदानात उतरले असून त्यांनी रत्नागिरीतील खेड (Khed) येथून पहिल्या जाहीर सभेची सुरुवात केली. त्यानंतर आता ते मालेगावात (Malegaon) येऊन धडकणार आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून नाशिकसह मालेगावचे वातावरण भगवामय झाल्याचे चित्र आहे. 


दादा भुसेंना अद्वय हिरे टक्कर देणार 


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मतदारसंघातून मंत्री दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एका मंत्रीपदाचा कार्यभार देखील ते सांभाळत आहेत. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेले होते. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अद्वय हिरे हे मालेगावमधून पुढचे आमदार असतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.


नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा


तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे तसेच वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे यशपाल भिंगे, बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड यांचा भारतीय राष्ट्रीय समितीमध्ये चंद्रशेखर राव यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. चंद्रशेखर राव यांचा हा दीड महिन्यातील दुसरा नांदेड दौरा आणि जाहीर सभा होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi Disqualified : चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला, राहुल गांधींवरील कारवाईवर उद्धव ठाकरे यांची टीका