Nanded News: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळांपैकी 80 महसूल मंडळातील खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसला आहे. या 80 महसूल मंडळापैकी 61 महसूल मंडळात दोन वेळेस, 32 महसूल मंडळात तीन वेळेस, 12 महसूल मंडळात चार वेळेस, 3 महसूल मंडळात पाच वेळेस, तर एका महसूल मंडळात सहा वेळेस अतिवृष्टी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता या पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांच्या 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे. 


कोणत्या तालुक्यात किती नुकसान....


नांदेड तालुक्यात 15 हजार 700 शेतकरी बाधित असून 9 हजार 630 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 91 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र, 3.17 हेक्टर फळपिक बाधित क्षेत्र असून 9 हजार 724.17 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर 110 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. 


अर्धापूर तालुक्यात 21 हजार 500 शेतकरी बाधित असून 10 हजार 81 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 1 हजार 70 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 11 हजार 151 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर 70 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. 


कंधार तालुक्यात 44 हजार 965 शेतकरी बाधित असून 24 हजार 100 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 15 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 24 हजार 115 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. 


लोहा तालुक्यात 41 हजार 200 शेतकरी बाधित असून 22 हजार 800 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


देगलूर तालुक्यात 32 हजार 400 शेतकरी बाधित असून एकूण 18 हजार 474 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


मुखेड तालुक्यात 21 हजार 300 शेतकरी बाधित असून 8 हजार 520 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


बिलोली लुक्यात 32 हजार 114 शेतकरी बाधित असून 15 हजार 557 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


नायगाव तालुक्यात 46 हजार 788 शेतकरी बाधित असून 14 हजार 15 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत बाधित क्षेत्र 110 हेक्टर असून 14 हजार 125  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. 


धर्माबाद तालुक्यात 20 हजार 748 शेतकरी बाधित असून,12 हजार हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर खरडून गेलेल्या शेतीचा आकडा 160 हेक्टर आहे. 


उमरी तालुक्यात 21 हजार 260 शेतकरी बाधित असून 9 हजार 540 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत क्षेत्र 1 हजार 530 हेक्टर असून, 11 हजार 70 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. 


भोकर तालुक्यात 40 हजार 950 शेतकरी बाधित, 25 हजार 180 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


मुदखेड तालुक्यात 30 हजार 107 शेतकरी बाधित असून 6 हजार 973 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


हदगाव तालुक्यात 52 हजार 431 शेतकरी बाधित असून 16 हजार 415 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळबाग 28 हेक्टर क्षेत्र असून 26 हजार 443 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 63 हेक्टर आहे. 


हिमायतनगर तालुक्यात 33 हजार 215 शेतकरी बाधित असून, 26 हजार 402 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 166 हेक्टर आहे. 


किनवट तालुक्यात 54 हजार 503 शेतकरी बाधित असून 48 हजार 832 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 720 हेक्टर आहे.


माहूर तालुक्यात 24 हजार 203 शेतकरी बाधित असून 16 हजार 63 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळपिक बाधित क्षेत्र 3 हेक्टर असून 16 हजार 66  हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 140 हेक्टर आहे.


उरलेले पंचनामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


सदर पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील 439 तलाठी, कृषि विभागातील 643 कृषि सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम करीत आहेत. आज रोजी 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.