Lumpy Skin Disease: गेल्या काही दिवसांपासून राज्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात सुद्धा आतापर्यंत 697 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. तर लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आज घडीला जिल्ह्यातील 4 लाख 998 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातील 83  गावांमध्ये लम्पी बाधित जनावरे आढळून आले आहे. या 83 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 36 हजार 150 एवढे आहे. यातील 697 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 433 एवढी आहे. एकुण गावे 516 झाली आहेत. या बाधित 83 गावांच्या 5 किमी परिघातील 516 गावातील (बाधित 83 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 38  हजार 974 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 29 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


पशुपालकांना निकषानुसार अर्थसहाय्य...


आतापर्यंत 29 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या 9 पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. इतर प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली. तर लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.


लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण


लम्पीचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून बाधित गावाच्या 5 किमी परिसरात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र औरंगाबादमध्ये लसीकरण केल्यानंतरही काही ठिकाणी जनावरांना लम्पीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर लसीकरण केल्यावर 21 दिवसांनंतर लम्पीचा धोका टळतो. मात्र त्यादरम्यान लागण होऊ शकते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


चिंताजनक! लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण; शेतकऱ्यांसमोर नवं संकट


काय सांगता! लम्पीच्या अनुषंगाने गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी जनजागृतीची जबाबदारी आता शिक्षकांवर