Aurangabad News: एकीकडे मुख्यालयी राहण्याचा मुद्द्यावरून शिक्षकांमध्ये संतपाचे वातावरण असतानाच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या एका निर्णयामुळे आता शिक्षक संघटना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. जनावरांवरील लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता याबाबत जनजागृतीची जबाबदारी आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यासोबतच ग्रामसेवक आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही हे काम देण्यात आले आहे. या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली.


जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आता पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना देण्यात आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सूचना दिल्या आहेत.  विकास मीना यांनी याबाबत मंगळवारी व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिक्षकांसह ग्रामसेवक व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनीही पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले. तसेच गावातच शंभर टक्के जनावरांचे लसीकर,बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी आदी उपक्रम राबविण्याबाबत शिक्षक आणि ग्रामसेवकांना निर्देशित केले.  


औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराची साथ पसरल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 107 गावात 1852 जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराची साथ पसरल्याचे पाहायला मिळाले. तर यापैकी 1404 गुरे पूर्णपणे बरी झाली असून, 451 गुरांवर उपचार सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण 5 लाख 34 हजार 394 जनावरांपैकी 5 लाख 18 हजार 923 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र लसीकरण करून सुद्धा काही ठिकाणी जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे लसीकरण केल्यावर काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 


आधीच शंभराहून अधिक अशैक्षणिक कामे...


यापूर्वीच शिक्षकांना शंभराहून अधिक अशैक्षणिक कामे देण्यात आल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशी सतत मागणी केली जाते. याबाबत शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलनही केले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांना लम्पी स्किन आजाराच्या जनजागृतीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्याने यासाठी शिक्षकांकडून कितपत प्रतिसाद मिळेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटनांकडून विरोध सुद्धा होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या...


अखेर कारवाई! मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात; आमदार बंब यांच्या मागणीला यश


Lumpy: औरंगाबादेत लम्पीचा साठा संपला, सुमारे वीस हजार जनावरे अजूनही लसीकरणापासून वंचित