Valentine Day: फेब्रुवारी महिन्याची सुरवात होताच युवकांना 'व्हॅलेंटाइन डे'चे (Valentine Day 2023) वेध लागतात आणि प्रेमाचा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' (Valentine Day 2023)आज आहे. दरम्यान प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी गुलाबाच्या (Rose) फुलांची निवड करतात. तर प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच गुलाबाच्या खरेदी-विक्रीतून नांदेडच्या (Nanded) बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. प्रेमाची उलगड करणारा हाच गुलाब जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा आधारही बनलाय.


प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या गुलाबाच्या विक्रीतून जिल्ह्याभरातील तीन हजार कुटुंबाच्या संसाराचा गाडा चालतोय. 7 फेब्रुवारी रोजी 'गुलाबपुष्प दिन'  तर, 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्यात गुलाबांच्या फुलांची मागणी वाढत असली, तरी आता वर्षभर कुठल्या न कुठल्या माध्यमातून, गुलाबांना मागणी येत आहे. त्यातूनच अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून, फूलशेतीची कास धरली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, मारतळा, पुणेगाव, आमदुरा, खांबाळा, वांगी, काकडी, तुप्पा, आसरजन, नाळेश्वर, संबाळा, निवघा या भागांत 1  हजार शेतकरी गुलाबाची शेती करतात. ही फुले मराठवाड्यासह मुंबई, पुणे,नाशिक,नागपूरच्या बाजारपेठेत विक्रीस जातात. सोबतच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात देखील फुलांची निर्यात केली जाते. 


Valentine Day 2023 : दररोज अंदाजे चार लाखांची उलाढाल... 


नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात दररोज सकाळी फुलांचे मार्केट भरताना पाहायला मिळते. सकाळी 6 वाजल्यापासून या भागात गुलाब, जास्वंद,  मोगरा, अशा विविध फुलांचा सुगंध दरवळतो. या बाजारपेठेत  मोठया फुलांची आवक होऊन या फुलांबरोबरच गुलाबाची खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होते. दरम्यान बाजारपेठेतील फुलांची मागणी लक्षात घेऊन निशिगंध, झेंडू, शेवंती, काकडा, मोगरा या फुलांची विक्री येथे होते. विशेष म्हणजे इतर फुलांच्या तुलनेत गुलाबांची खरेदी-विक्री जोरात असते. दररोज जवळपास 20 क्विंटल गुलाबांची या बाजारपेठेत विक्री होते. सरासरी 150 ते 200 रुपये किलो भाव मिळतो, ज्यातून  दिवसभरात 4 लाखांची उलाढाल होते. या बाजारपेठेत 12  होलसेल व्यापारी असून, 100 ते 150 किरकोळ व्यापारी आहेत. यातून फुलशेती करणारे शेतकरी, व्यापारी, फुल विक्री, खरेदी बुके, हार तयार करणारे कारागीर अशा तीन  हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.


Valentine Day 2023 : गुलाबाचा फुल अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा आधार बनलाय.


गावरान, सीडी गुलाब आणि डच गुलाबाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक असते. गावरान गुलाब हा सुगंधित असतो, तर सीडी गुलाबाला सुगंध नसतो. मात्र फूल आकर्षक व जास्त काळ टिकणारे असल्यामुळे सीडी गुलाबाला मागणी आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि  लग्नसराईच्या सिझनमध्ये गुलाबांच्या फुलांची मागणी वाढते. जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून फुलांची आवक झाल्यानंतर, छोटे मोठे व्यावसायिक त्याचे आकर्षक हार तसेच पुष्पगुच्छ तयार करून विक्री करतात. गुलाब फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपासून फुल व्यवसाय चालतो. त्यामुळे प्रेमाचे प्रतीक गुलाब फुल, शेतकरी, बाजारपेठेतील ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते, जिल्हाभरात पसरलेले छोटे मोठे विक्रेते यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार बनलाय.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Valentine Day : लाल इश्क...! प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? 'हे' कारण तुम्हालाही माहीत नसेल