Devagiri Express: मुंबई (Mumbai) देवगिरी एक्सप्रेस आज सोमवारपासून नवीन डब्यांसह धावली आहे. नांदेड ते मुंबई धावणाऱ्या या रेल्वेतील अस्वच्छतेबद्दल सेलिब्रेटी आणि प्रवाशांनी देखील अनेकवेळा आवाज उठवत तक्रारी केल्या होत्या. दरम्यान या सर्व गोष्टींची उशिरा का असेना दखल घेत, एलएचबी कोच लावून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिरवा कंदील दाखवत नवीन रुपात, देवगिरी एक्सप्रेस धावली आहे. दरम्यान या रेल्वेला लागलेले डब्बे आपल्या मुळेच लागल्याची चढाओढ माजी आता माजी मंत्री, दोन खासदार आणि आमदारांमध्ये लागली आहे.


'माझ्याचमुळे गाडीला नवीन डबे जोडले गेल्याचा बसविले आहेत, असा दावा माजी मंत्री खासदार आणि आमदारांनी केला आहे. श्रेयवादाच्या रेल्वेत बसण्यासाठी स्थानिक नेत्यांची जशी लगीनघाई सुरू आहे, तशीच इतर विकासात्मक प्रकल्पाबाबत का नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे नांदेडसह परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यातून धावणारी देवगिरी ही  रेल्वेगाडी आहे. नव्याने जोडण्यात आलेल्या या एलएचबी कोच हे आरामदायी बैठक व्यवस्था, सुसज्ज इंटेरिअर, वातानुकूलित व सीसीटीव्ही कॅमऱ्यासह सुरक्षित करण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवाशांना एक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. या डब्यांची अंतर्गत रचना सुंदरपणे बनविली आहे. दर्जेदार बर्थ कुशन, सुरक्षित प्रवासाच्या उद्देशाने वातानुकूलित डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ज्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनधिकृत व्यक्तीच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील. तसेच स्वच्छ वॉश-बेसिन, वॉशरूम, स्वच्छ पाण्यासह सर्वसोयी सुविधा युक्त बोगी जोडण्यात आल्या आहेत.


दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वप्रथम जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनातील भाषणातून देवगिरी एक्स्प्रेसच्या प्रश्नावर प्रकाश टाकला होता. या मागणीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. यासंदर्भात स्वतः दानवे यांनी चव्हाण यांना फोन करून माहिती दिली होती. तर दुसरीकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी 2 फेब्रुवारी रोजी राज्यमंत्री दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देवगिरीच्या अनुषंगाने रितसर मागणी केल्याचे पत्रच प्रसारमाध्यमांना दिले आहे. तसेच त्यांना रेल्वे मंत्र्यांकडून पत्रही देण्यात आले. या दोन नेत्यांपैकी खरा पाठपुरावा कुणाचा? अशा चर्चा सुरु असतानाच 8 फेब्रुवारी रोजी खासदार प्रतापराव पाटील यांना दानवे यांनी पाठविलेले पत्र पुढे आले. त्यानंतर स्थानिक खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे प्रवासी संघटनांनी देखील देवगिरीला नवीन कोच बसविण्याची मागणी केली. या मागणीला अखेर यश आले असून देवगिरी एक्स्प्रेस आता नव्या रूपात म्हणजे एलएचबी कोच हे अत्याधुनिक डबे घेऊन अखेर धावलीय. परंतु नवीन कोच बसविण्यात माझाच वाटा असल्याचा दावा  नेत्यांकडून केला जात आहे.