Youth Fraud: नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, केंद्र सरकारच्या नोकर भरतीची जाहिरात देऊन सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्वप्रकार ABP माझाने उघडकीस आणलाय. त्यांनतर रोजगार तरुणांना गंडवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशी होती जाहिरात....
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ई-गव्हरनन्स प्रकल्पाअंतर्गत डाटा इन्ट्री ऑपरेटर पदासाठी ही जाहिरात देण्यात आली होती. ज्यात या पदासाठी 12 वी शैक्षणिक अहर्तता असणाऱ्या महिला व पुरुषांसाठी जागा रिक्त असल्याच जाहिरातमध्ये उल्लेख करण्यात आला होता. तसेच या पद भरती प्रक्रियेची जाहिरात व्हाट्सएप, फ़ेसबुक, ट्विटर या सोशल माध्यमांवरून देण्यात आली होती. तर नांदेड शहरातील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या भरती प्रक्रियेची मुलाखत घेणे चालू होती.
पोलिसांनी घेतल ताब्यात...
या सर्व घटनेची माहिती, नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. यासाठी नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर, जालना, बीड, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरून मुलाखत देण्यासाठी आले होते. त्यांनतर आता तरुणांना गंडवणारे या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.
कारवाईबाबत चालढकल...
नोकरीच्या नावाने तरुणांची फसवणूक करणारी मोठी टोळी नांदेड जिल्ह्यात सक्रीय असताना याची कोणतेही खबर प्रशासनाला लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोबतच या टोळक्यावर कारवाई करण्यापेक्षा आता कोणते विभाग कारवाई करणार याविषयी महसूल विभाग आणि पोलिसांकडून चाल ढकल सुरु आहे.
'ABP माझा'मुळे फुटलं बिंग...
नोकरीच्या नावाने सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळण्यात येत असून, एक मोठी टोळी नांदेडमध्ये सक्रीय असल्याची माहिती 'ABP माझा'च्या प्रतिनिधीला मिळाली होती. त्यामुळे हा सर्व प्रकार कॅमऱ्यात कैद झाला. त्यांनतर याची माहिती संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देताच या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता ताब्यात घेतलेल्या या लोकांवर गुन्हा कधी दाखल होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचे असणार आहे.