नांदेड : नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या घरातील संपत्तीचा वाद चिघळला आहे. संजय बियाणी यांच्या पत्नीनंतर दुसऱ्याच महिलेने त्यांच्या संपत्तीवर दावा केला आहे. या महिलेने चार वर्षीय मुलीसह न्यायालयात धाव घेतली असून तिच संजय बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे बियाणी कुटुंबातील संपत्तीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी भरदिवसा त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. र हे प्रकरण राज्यभर गाजलं होतं. त्यांच्या हत्येमुळे उद्योजक आणि व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणात तब्बल दोन महिन्याच्या कालावधीनंतर या हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यात यश आलं. तर संजय बियाणी यांच्या हत्येला केवळ दीड महिन्याचा अवधी लोटला असताना त्यांच्या घरातील संपत्तीचा वाद उफाळून आला. ज्यात बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी पतीने भाऊ प्रवीण आणि रवी बियाणी यांच्या नावे केलेली संपत्ती परत करावी यासाठी पोलिसात धाव घेतली होती. संजय बियाणी यांची पत्नी आणि भावातील संपत्ती वरुन वाद चालू असून या प्रकरणात संजय बियाणी यांचे बंधू प्रविण बियाणी यांना हार्ड डिस्क चोरी प्रकरणी पोलीस कोठडी झाली होती.
हे प्रकरण ताजे असतानाच बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी संपत्तीच्या वारसदार म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान या दाव्यावर आता एका महिलेने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. संबंधित महिलेने आपली चार वर्षीय श्रद्धा नावाची मुलगी ही बियाणी यांच्या संपत्तीची वारसदार असल्याचं अर्जात नमूद केलं आहे. या प्रकरणात काल (17 जून) सुनावणी होती, परंतु कागदपत्रे जमा करण्यासाठी या महिलेच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 24 जून रोजी ठेवण्यात आली आहे.
बियाणी कुटुंबातील वाद
संजय बियाणी हयात असताना विश्वास ठेवून त्यांनी रवी बियाणी यांच्या नावे 13 एकर तर प्रवीण बियाणी यांच्या नावे 6 एकर जमीन अशी एकूण 19 एकर जमीन केली होती. दरम्यान बियाणी यांच्या हत्येनंतर संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी रवी बियाणी आणि प्रवीण बियाणी यांना सदर जमीन आपला मुलगा राज बियाणी यांच्या नावे करुन देण्यास सांगितली. पण जमीन नावावर करुन द्यायची असेल तर रवी बियाणी यांनी दोन कोटी रुपये आणि प्रवीण बियाणी यांनी 94 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अनिता बियाणी यांनी केला आहे.
तर प्रवीण बियाणी यांनी सदर जमीन आपण स्वतः घेतली असून राज मॉल येथील कार्यालय सुद्धा संजय बियाणी यांचे नसून आपले असल्याचे सांगितलं. परस्परविरोधी तक्रार दिल्यानंतर प्रवीण बियाणी यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्याठिकाणी रुग्णालयातही पोलिसांचा खडा पहारा बियाणी यांना आहे. परंतु या वादाविषयी विमानतळ पोलिसांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दीर प्रवीण बियाणी यांनी दोन दिवसांपूर्वी घरी येऊन वाद घातल्याचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. दरम्यान संजय बियाणी यांच्या हत्येनंतर अवघ्या अडीच महिन्यात आर्थिक व्यवहारातून कौटुंबिक कलह मात्र उफाळला आहे, ज्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटलंय हे मात्र नक्की आहे.