Nanded Suicide News : नांदेड जिल्ह्यात (Nanded District) एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, दोन मुलींच्या लग्नाची चिंता तसेच आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने बेरोजगार पित्याने स्वतःला पेटवून घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथे शुक्रवारी (24 मार्च) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घडली आहे. नंदू जाधव (वय 37 वर्षे) असे मृताचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदू जाधव हे खाजगी बस चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. वाढती महागाई व लोकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करणे व दोन मुली लग्नाला आल्यामुळे ते सतत चिंतेत होते. लोकांचे देणे झाले असल्याने आणि हातात येणाऱ्या तोडक्या पगारातून पैश्यांची जुडवाजुडव होत नव्हती. तसेच दोन मुलींच्या लग्नासाठी पैसे कोठून आणावे या चिंतेत नंदू जाधव असायचे. त्यामुळे याच चिंतेतून त्यांनी अंगावर डीझेल घेऊन स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत भाजलेल्या अवस्थेत असलेल्या जाधव यांचा मृत्यू झाल्याने, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ईस्लापूर येथे पाठीवले होते. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मजुराच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम कंत्राटदारवर गुन्हा दाखल केला आहे. नांदेड शहरातील महापालिकेच्या महात्मा फुले व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कामावर असलेल्या बालाजी रामा खंडागळे या मजुराचा 15 मार्च रोजी पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कंत्राटदाराने पाचवा मजला ते पहिला मजला या दरम्यान मोकळ्या असलेल्या जागेवर सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. तसेच कामगारांकडून सुरक्षिततेची साधने न वापरता काम करून घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणा केल्याचे तपासात पुढे आल्याने कंत्राटदार रामानी पटेल याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :