CM Eknath Shinde Nanded Visit : नांदेड-हिंगोली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंगोली दौरा आटोपून मध्यरात्री एक वाजता भरपावसात नांदेड (Nanded) येथील प्रसिद्ध तख्त संचखड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वारा (Takhat Sachkhand Sri Hazur Abchal Nagar Sahib) इथे भेट दिली आणि दर्शन घेतलं. पावसाचा वाढता जोर आणि वेळेची तमा न बाळगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री एक वाजता सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दाखल होत नतमस्तक झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात कालपासून पाच ते सात वेळेस बदल करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री नांदेडात येईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबाबत निश्चितपणे माहिती समोर येत नव्हती. शेवटी मुख्यमंत्री शिंदे याचं नांदेडमध्ये आगमन झालं.
नांदेड इथली सभा, हिंगोली इथली कावड यात्रा तसंच सभा आटोपून ते एक वाजता सचखंड गरुद्वारा चरणी दाखल झाले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शीख धर्मियांची मानाची पगडी बांधून आणि तलवार भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
हिंगोली दौऱ्यात औंढा नागनाथचं दर्शन, दुग्धाभिषेक घालून पूजा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (8 ऑगस्ट) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. हिंगोली शहरातील सभा संपल्यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी औंढा नागनाथ इथे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिराचे दर्शन घेतले. श्रावण सोमवार असल्याने मुख्यमंत्र्यांनी नागनाथ शिवलिंगाला दुग्धाभिषेक घालून पूजा सुद्धा केली.
मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
दर्शन घेऊन झाल्यानंतर परतताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली. यावेळी बोलताना मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे उद्या कळेल. उद्या तुम्हाला बातमी मिळे, असं ते म्हणाले.
आज मंत्रिमंडळ विस्तार, 18 जणांचा शपथविधी
दरम्यान अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता राजभवन इथे 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटाचे सात मंत्री तर भाजपकडून 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.