CM Eknath Shinde On Nanded Hingoli Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नांदेड, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा कहर आहे. शेतकऱ्यांचं पावसामुळं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर पडलाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यभरात पावसाचा कहर आहे. त्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं शेतकऱ्यांनी दाद कुठे मागायची? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
पावसाने नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन कानपिचक्या दिल्या होत्या. परंतु आज मुख्यमंत्री या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना याच मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर पडला आहे असं दिसतंय. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करावी अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणीचा साधा उल्लेख सुद्धा केलेला दिसत नाही. जरी दौऱ्यात उल्लेख नसला तरी मुख्यमंत्री शिंदे हे नुकसानीची पाहणी करतील आणि आढावा घेतील तसेच शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात काही घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता मुंबई येथून विमानाने श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने गुरूद्वाराकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 11.50 वाजेपर्यंत हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे राखीव. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत गोदावरी अर्बन बँकेस भेट. (संदर्भ खासदार हेमंत पाटील). दुपारी 12.40 ते 1.15 वाजेपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी. दुपारी 1.15 ते 1.45 वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथील मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 2.30 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. हिंगोली येथून नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली जिल्हा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 2.30 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.00 वाजता अग्रसेन चौक, नांदेड नाका, हिंगोली येथे भव्य कावड यात्रेस उपस्थिती. 4.00 ते 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव . सांय. 5.00 वाजता गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा. सांय. 6.30 ते 6.45 वाजता फार्म हाऊस, सावरखेडा, हिंगोली येथे राखीव. सांय. 6.45 वाजता हिंगोली येथून मोटारीने औढा नागनाथकडे प्रयाण. सायं. 7.15 वाजता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व राखीव. सांय. 7.45 वाजता औंढा नागनाथ येथून बसमत मार्गे मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण.