नांदेड : आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा (Harvinder Singh Rinda) यांच्या भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याना 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


हरविंदर सिंह रिंदा हा पाकिस्तानमध्ये पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. परंतु रिंदाच्या नावाने अद्याप खंडणी उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यातच काही महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या तक्रारीवरून रिंदाचे वडील आणि भावासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंद झाला होता. 


वडील आणि भावाकडून खंडणीचं काम 


हरविंदर सिंह रिंदाच्या वडील आणि भावावर आता पोलिसांनी फास आवळला आहे. दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याने नांदेडात बिल्डर, उद्योजक, डॉक्टर, व्यापारी यासह अनेकांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळली आहे. खंडणीची ही रक्कम तो देशविरोधी कारवायांसाठी वापरत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. 


बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी रिंदाच्या टोळीवर फास आवळला. रिंदाचे अनेक हस्तक अद्याप तुरुंगात आहेत. रिंदाही पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतरही रिंदाच्या नावाने धमकावून खंडणीचे प्रकार सुरूच होते.


तक्रार देण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तपासात रिंदाच्या नावाने गोळा झालेली खंडणी हे त्याचे वडील चरणजितसिंघ संधू आणि भाऊ सरबज्योतसिंह संधू याच्याकडे देण्यात येत होती असे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही उचलले. बुधवारी कडेकोट बंदोबस्तात दोघांनाही न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची दाट शक्यता आहे.


कोण आहे हरविंदर सिंह रिंदा?


हरविंदर सिंह रिंदा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून काम करत होता. रिंदा हा पंजाबसह देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली होती. अलीकडील पंजाबमधील अनेक मोठ्या घटनांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते. खून, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी व स्नॅचिंग अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पंजाब पोलिसांना तो हवा आहे. हरविंदर रिंदा याने अलीकडेच पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट हल्ला घडवून आणला होता. यापूर्वी त्याने नवांशहर, आनंदपूर साहिब आणि काहलवान येथील सीआयए कार्यालयावर आयईडी हल्ले घडवून आणले होते.


ही बातमी वाचा: