Eye Conjunctivitis : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल (Climate Change) होत असल्याने, राज्यातील अनेक भागात डोळ्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठवाड्यातील जालना (jalna) आणि परभणी (Parbhani) या दोन जिल्ह्यात देखील डोळ्याची साथ पाहायला मिळत असताना, आता लातूर (Latur) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यात सुद्धा डोळ्याची साथ सुरु झाली आहे. डोळ्यातून पाणी येणे, घाण येणे, डोळे लाल होणे या आजाराची प्राथमिक लक्षणं आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नेत्रविभागात रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. 


'डोळे येणे' हा एक संसर्गजन्य आजार आहे. विशेषतः पावसाळ्यात हा आजार पसरताना पाहायला मिळतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, सूज येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने त्याचे प्रमाण वाढत आहे. लातूर जिल्ह्यात सुद्धा अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दररोज वीस ते पंचवीस रुग्णांची नेत्र तपासणी होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये दोनशे पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


नांदेड जिल्ह्यात सुद्धा रुग्ण वाढले.. 


जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात सुद्धा डोळ्याची साथ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सलग दोनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे वातावरणातही बदल झाला असून, साथरोग वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सर्वाधिक नागरिकांना डोळे येण्याच्या साथीने हैराण केले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहे. 


नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन -



  • ज्या विभागात पावसामुळे माश्या किंवा चिलटाचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.

  • ज्या व्यक्तींमध्ये कन्‍जक्‍टिव्‍हायटिस (Conjunctivitis) आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे 

  • तसेच डोळ्याला वारंवार हात लाऊ नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.

  • एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

  • व्यक्तीचे कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवावीत जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.

  • शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलाला/मुलीला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. 

  • शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्‍जक्‍टिव्‍हायटिसची लक्षणे आढळून आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.

  • डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी कन्‍जक्‍टिव्‍हायटीस आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या मनपा रुग्णालयात, दवाखान्यात, आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Eye Conjunctivitis : परभणीसह जालना जिल्ह्यात डोळ्याची साथ; संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन